Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeकोरोनातिसर्‍या लाटेचे संकेत; लोकाहो, सतर्क रहा एम्सचे डॉक्टर म्हणाले, सहा ते आठ...

तिसर्‍या लाटेचे संकेत; लोकाहो, सतर्क रहा एम्सचे डॉक्टर म्हणाले, सहा ते आठ आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट

जिल्ह्यात बाधितांचा आकडा शेकड्यावर असला तरी मृत्यू वाढले; चार
दिवसात 87 मृत्यू

बीड (रिपोर्टर):- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल कोविड आढावा घेतल्यानंतर बीड, उस्मानाबादमध्ये कोरोना बाधितांची संख्या तुलनेने जास्त असल्याचे कबूल करून सोशल डिस्टन्स आणि मास्कचा काटेकोरपणे वापर करण्याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना देत मास्क न वापरणार्‍यास पाचशे रुपये दंड आकारण्याच्या सूचनाही दिल्या. त्यात जिल्ह्यातील कोविड सेंटरमधून आलेल्या माहितीनुसार गेल्या चार दिवसात 87 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आल्याने बीड जिल्ह्यात अद्याप कोरोना डोकं वर काढण्याच्या मन:स्थितीत आहे तर दुसरीकडे येत्या सहा ते आठ आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत जिल्हावासियांनी आता कोरोना रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे.


भारतात पुढील सहा ते आठवड्यात करोनाची तिसरी लाट येणार असून ती टाळता येणं अशक्य असल्याचं एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे. देशातील अनेक भागांमध्ये कडर निर्बंधांनंतर शिथीलता आणत अनलॉकची प्रक्रिया सुरु असताना रणदीप गुलेरिया यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं मोठं आव्हान असून कोव्हिशिल्डमधील अंतर वाढवणं त्यासाठी वाईट पर्याय नसल्याचंही सांगितलं आहे.


यावेळी त्यांनी डेल्टा प्लस विषाणूसंबंधी बोलताना विषाणूंच्या परिवर्तनाचा पुढील अभ्यास करण्यासाठी करोनाविराधातील लढाईत नव्याने रुपरेषा आखण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. आपण अनलॉक करत असताना पुन्हा एकदा लोकांकडून करोनासंबंधित सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेपासून आपण धडा घेतलेला दिसत नाही. पुन्हा एकदा गर्दी होत आहे, लोक एकत्र येत आहेत. राष्ट्रीय स्तरावर रुग्णसंख्या वाढण्यास काही वेळ लागेल. पण तिसरी लाट अपरिहार्य असून पुढील सहा ते आठवड्यात येऊ शकते जास्त काळही लागू शकतो, असं यावेळी रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे. गुलेरिया यांच्या या इशार्‍याची गंभीर दखल प्रशासनाबरोबर बीड जिल्ह्यातील जनतेने घ्यायला हवी. आज जरी कोरोना बाधितांचा
आकडा हजारावरून शेकड्यावर आला तरी मृत्युचा आकडा रोज वाढत आहे. 14 जून रोजी बीड जिल्ह्यात एकूण 2 हजार 346 बाधितांचे मृत्यू झाले होते. तो आकडा 18 जून रोजी 2 हजार 433 वर जाऊन पोहचल्याने बीड जिल्ह्यात अवघ्या चार दिवसात 87 कोरोना बाधितांचे मृत्यू झाले आहेत. कोरोना हा जीवघेणा ठरू लागल्याने आणि तिसर्‍या लाटेचे संकेत येत असल्याने बीड जिल्हावासियांनी कोरोना बाबत अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

Most Popular

error: Content is protected !!