पालकांचा हत्येचा संशय; पोलिसांकडे दोघांची नावे इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी
दोघा जणांवर केला संशय व्यक्त
दिंद्रुड (रिपोर्टर) सरपन आणण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय मुलाचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्याने नित्रूड येथे एकच खळबळ उडाली आहे. सदरील मुलाने आत्महत्या केली नसून त्याला जिवे मारण्यात आल्याचा संशय त्याच्या घरच्या लोकांनी घेतला. याबाबत दोघा जणांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास दिंद्रुड पोलीस करत आहेत.
गुलाम मोहम्मद हाफिज शेख (वय 15 वर्षे) हा 9 वी वर्गात शिक्षण घेत असलेला मुलगा आज सकाळी सरपण आणण्यासाठी शेतामध्ये गेला होता. त्याच्या सोबत त्याची लहान बहीन समरीन व भाऊ हुजेफ होता. सदरील मुलाचा मृतदेह एका झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मुलाला कैलास ऊर्फ पिंटू डाके व त्याचा साथीदार वानखेडे या दोघांनी मारले असावे, असा संशय मुलाच्या घरच्या लोकांनी घेतला आहे. मयत गुलाम मोहम्मद हाफिज शेख याच्या सोबत जे दोन लहान भावंडे गेले होते त्या दोघांकडे विचारपूस केली असता गुलाम यास कैलास डाके व वानखेडे हे दोघे मारत होते, हा प्रकार पाहून आम्ही भयभीत झालो आणि घराकडे पळून आलो, असे या दोघांनी सांगितल्याचे समजते. घटनेची माहिती दिंद्रुड पोलिसांना झाल्यानंतर पोलीस त्याठिकाणी दाखल झाले होते. माझ्या मुलाचा घातपात झाला असून दोषींविरोधात योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मयताचा पिता हाफिज शेख याने पोलीस प्रशासनाकडे केली असून मृतदेहाचे शवविच्छेदन इनकॅमेरा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. या घटनेने नित्रुड परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.