बीड (रिपोर्टर): विद्यमान सरकारवर आमदारांचा विश्वास नाही. हे राज्यसभेच्या निवडणूकीतून नुकतेच सिद्ध झाले आहे. लोकांच्या विश्वास हा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यामुळे विनायक मेटे तुमच्यावर देवेंद्र फडणवीस प्रेम करतात त्यामुळे ते तुम्हाला निराश करणार नाहीत. तुम्ही संयम बाळगा, राजकारणामध्ये उन्नीस बिस होत असते. त्यामुळे भविष्यात तुम्हाला भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निश्चित न्याय मिळेल असे राज्याचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी आ.विनायक मेटे यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषद आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने आज धनगर समाजातील विविध क्षेत्रात काम करणार्या मान्यवरांचा पुरस्कार देवून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सन्मान करण्यात आला.
त्यावेळी राज्याचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर बोलत होते. दरेकर पुढे बोलताना म्हणाले की, 17 व्या शतकामध्ये अहिल्यादेवी होळकर यांनी खुप मोठे काम केले आहे. पुरुषाच्या बरोबरीने महिलांचेही नाव 7/12 वर लागले पाहिजे ही भुमिका त्यावेळी त्यांनी घेतली. अनेक मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी त्यांनी निधी दिला. धनगर समाजातील काम करणार्या व्यक्तीच्या पाठीमागे अनेक ठिकाणी निधी देण्याचे कामही त्यावेळी अहिल्याबाई होळकर यांनी केले आहे. त्यामुळे मेटे साहेबांनी संयम बाळगत काम करत रहावं, समाज आणि राजकीय पक्षातही काम करणार्यांची दखल घेतली जाते. उद्याचा सत्तेचा उगवता सुर्य हा भाजप पक्ष आहे आणि तुम्ही भाजपाचे घटक पक्ष आहात. तुम्ही मराठा समाजाचं काम करत असतांना विधीमंडळात अनेकवेळा बहुजन समाजाचे अनेक प्रश्न उचलून धरले आहेत. तुमच्या धनगर समाजाच्या काम करण्याच्या भुमिकेमुळे त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाच्या विकासासाठी 100 कोटीचा निधी दिला होता. तुम्ही काम करताना मुस्लिम आणि इतर समाजासाठीही काम केले आहे. लोकं उगवत्या सुर्याला नमस्कार करतात. इतरांनी कोणी एखाद्या विद्यमान मंत्र्याला या कार्यक्रमाला बोलावलं असतं मात्र तुमच्यात तेवढी जान आहे आणि उद्याचा उगवता सुर्य हा भाजप आहे. त्यामुळे तुम्ही मला विरोधी पक्षनेता म्हणून बोलावलं आहे. त्यामुळे तुमचे काम दखलपात्र असतांना देवेंद्र फडणवीसही तुमच्यावर अन्याय होवू देणार नाहीत असे दरेकर यांनी या कार्यक्रमाच्या प्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना आ.विनायक मेटे म्हणाले की, बीड जिल्ह्यामध्ये अनेक ओबीसी समाजाचे नेते आहेत. मात्र त्यांनी ओबीसी समाजाचा राजकारणासाठी वापर केला. ओबीसीचे कोणतेही प्रश्न विधीमंडळात कधीच विचारले नाहीत. येथील ओबीसी समाजाच्या विद्यमान आमदाराला तर काहीच कळत नाही. आपण आता कुठपर्यंत मित्र पक्षाला आणि इतरांना मागायचं त्यामुळे आपणच स्वत: स्वकतृत्वानं मिळवायचं आहे. त्यामुळे येणार्या 2024 ला होणार्या विधानसभा निवडणूकीतून लोकांतून आमदार व्हायचं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनो तुम्ही आत्तापासून कामाला लागा. बीड जिल्ह्यातील अनेक महिलांनी खुप चांगलं काम केलं आहे. त्याची सुरूवात स्व.खा. केशरकाकू क्षीरसागर यांनी केली आहे. विद्यमान परिस्थितीमध्ये खा.प्रितमताई मुंडे आणि पंकजा मुंडे हेही चांगलं काम करतात. बीड जिल्हा हा नेहमी ऊस तोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण करून देण्यात येथील काही सत्ताधारी स्वत:ला धन्य समजतात ते पाप काही राजकीय लोकांनीच केलं आहे. कारण येथील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल असा कोणताही मोठा उद्योग निर्माण केला नाही असेही आ.विनायक मेटे यांनी यावेळी सांगितले. शिवसंग्राम प्रविण भारतीय संग्राम परिषदेच्या वतीने धनगर समाजातील आरोग्य, प्रशासन, उद्योग आणि मेंढपाळ क्षेत्रात काम करणार्या लोकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्य आकर्षक म्हणून अभिनेत्री आणि जय मल्हार मालिकेत बानुची भुमिका साकारणार्या इशा केसकर याही प्रामुख्याने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला शिवसंग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशीद, महिला जिल्हाध्यक्षा मनिषाताई कुपकर, शहराध्यक्ष अॅड.राहुल मस्के आदी मान्यवर उपस्थित होते.