Friday, May 20, 2022
No menu items!
Homeसंपादकीयमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी

मराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी

-गणेश सावंत-

मो. नं. ९४२२७४२८१०


सत्तेचं अमरत्व आपल्याकडेच आहे या तोर्‍यात वागणार्‍या आणि विजयी अश्‍व आपलाच दौडणार या भाबडेपणात वावरणार्‍या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात मात्र अमरत्त्वाचं कोडं पडलं अन् विजयी अश्‍वाऐवजी बंडखोरीचं घोडं जिथं तिथं नडल्याने औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे अन् विधानसभेचे विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या सौख्याचे उभ्या महाराष्ट्राला दर्शन असल्याने औरंगाबादच्या या निवडणूकीत या दोघांचे फासे विरोधकांना लटकवणार आहेत की स्वकीयांनाच लटकवतील यावर आता उघडपणे चर्चा होतांना दिसून येते ती केवळ भाजपात झालेल्या बंडखोरीमुळे. त्यातूनच महाविकास आघाडीसाठी विद्यमान आमदार तथा उमेदवार सतिष चव्हाण यांची आलेली उमेदवारी ही भाजपाकडून देण्यात आलेल्या उमेदवारीपेक्षा सरस ठरते आणि त्यातच अवघ्या दहा दिवसात ७८ तालुक्यात राबविण्यात येणार्‍या प्रचार यंत्रणेत भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर हे पोहचू शकतील का? ही जेंव्हा शंका येते तेंव्हा भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा अंतर्गत गटबाजीतून बोराळकरांची मान त्या फाशात आत्ताच लटकवल्याचे चित्र दिसून येते. खर पाहिलं तर उमेदवारी देता वेळेसच महाराष्ट्र भाजपाने मराठवाड्याच्या नेतृत्वाला विश्‍वासात घेतले नाही. याची ओरड झाल्यानंतरही राज्य नेतृत्वाने आपल्या अहंमपणाचा नमुणा दाखवून अंतर्गत गटबाजीत आम्हीच सरस आहोत हे दाखवून देत औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे उमेदवार घोषीत केले. यातून बरेच नाराजी नाट्य भाजपामध्ये पहावयास मिळाले मात्र नंतर तु मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं म्हणत या निवडणूकीची स्थिती जैसे थे अशी ठेवण्यात आली. एक तर महाराष्ट्रातून सत्ता गेल्यानंतर भाजपाचं राज्यातील नेतृत्व अन् विधानसभेत पराभूत झाल्याने नैराश्येत आलेले बीड जिल्ह्याचं नेतृत्व हे केवळ स्वत:च्या अस्तित्वाकडे किंवा मी किती मोठा आहे याकडेच अधिक लक्ष देत असल्याचे चित्र उभ्या महाराष्ट्रात पहायला मिळाले. मात्र त्यात भाजपासाठी रात्रीचा दिवस करणार्‍या कार्यकर्त्यांचं काय? हा सवाल जेंव्हा कार्यकर्तेच उपस्थित करू लागले तेंव्हा
घर फिरलं की घराचे वासे फिरतात
त्या पद्धतीने महाराष्ट्रात अहंम, अहंकार आणि मी पणामुळे महाराष्ट्र भाजपाची वाताहत झाली. अन् तिथूनच भाजपाचे खंदे समर्थक निष्ठावंत त्यांंना सोडून चालले. उत्तर महाराष्ट्रातून एकनाथ खडसेंनी राज्य भाजप नेतृत्वाबाबत जाहीर नाराजी व्यक्त करत भाजपाला रामराम ठोकला तर औरंगाबाद पदवीधर मतदार संघात आमदार राहिलेले बीड लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व केले माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंग गायकवाडांनीही भाजपाला सोडचिठ्ठी दिली. मात्र तरीही भारतीय जनता पार्टीतील नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या अहंमपणामध्ये कुठेही कमी दिसून आली नाही. त्यात विधान परिषदेची निवडणूक लागली अन् औरंगाबाद मतदार संघासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांना उमेदवारी दिली जाईल असा भाबडा आशावाद मुंडे समर्थकात लागून राहिला. परंतू प्रत्यक्षात जेंव्हा उमेदवारी ही शिरीष बोराळकर यांना भाजपाकडून देण्यात आली तेंव्हा मुंडेंना पुन्हा एकदा पक्षसृष्टींनी डावलल्याचे चित्र मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रात उभे राहिले. मुुंडे समर्थक घर फिरवणार्‍या विरोधात चेकाळून उठले. मात्र राजकारणामध्ये जिस की भैस उस की लाठी असते हे माजी मंत्री मुंडेंच्या लक्षात आले असावे म्हणूनच हा उमेदवार आपलाच असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. मात्र आपले खंदे समर्थक बीड जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष रमेश पोकळे यांची उमेदवारी वापस घेण्याबाबत कुठलेही जाहिर प्रयत्न केल्याचे निदर्शनास नसल्याने बोराळकर यांना मुंडे समर्थक पदवीधर मतदान करतीलच? हे सांगणे कठीण होवून बसले. त्यामुळे ही निवडणूक अधिक रंगतदार होतांना दिसून येत आहे. निवडणूकीमध्ये एका उमेदवाराचा विजय तर दुसर्‍याचा पराजय हे उघड सत्य आज ना उद्या समोर येते. परंतू या निवडणूकीमध्ये खर चित्र ते भाजपामध्ये कोणता उमेदवार दिला असता तर काय झाले असते यावर निकालानंतर भाष्य होईल आणि पुन्हा एकदा एकमेकांचे उणे-दुणे काढणे भाजपातील अंतर्गत वादाला तोंड फोडणार्‍या नेतृत्वाच्या कामी येईल. भाजपातील
अंतर्गत वाद

त्यापेक्षा मुंडे-फडणवीस, मुंडे-मेटे, मुंडे-अन्य हे जे उफळुन येतात. ते केवळ भाजपाच्या राज्य नेतृत्वाच्या भूमिकेमुळे हे ही वेळोवेळी सिद्ध झाले आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे या माघार घ्यायला कधीच तयार नसतात. जाहीरपणे पंकजा मुंडे अहंकारी आहेत असेही लोक बोलतात. परंतू सत्य असल्याने मी माघार घेत नाही, मी कधी कोणासमोर झुकणार नाही ही ठाम भूमिका पंकजा मुंडेंची असते. म्हणूनच या निवडणुकीत शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर ज्या पद्धतीने भाजपात अंतर्गत वाद सुरू झाला त्या वादाची झालर भाजपाचे सहकारी पक्ष हे ही राहिले. शिवसंग्रामचे सर्वासर्वे आ.विनायक मेटे यांनीही जाहीर पणाने नाराजी व्यक्त करत मित्र पक्षांना भाजपाने विश्‍वासात घेतले नाही त्यामुळे या निवडणूकीत नेमके काय करायचे हे आम्ही ठरवू. स्थानिक नेतृत्वाने ही आम्हाला विचारात घेतले नाही ही नाराजगी बोलून दाखवत असतांना आ.मेटे या निवडणूकीत शिरीष बोराळकर यांच्यासोबत असतील? परंतू राज्य नेतृत्वाचा विचार केला आणि स्थानिक नेतृत्वातील वाद पाहिला तर मेटे ऐनवेळी आपली भूमीका ठरवू शकतील. विषय औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचा असल्याने या निवडणूकीमध्ये भाजपाच्या उमेदवाराला अंतर्गत वादाचा जेवढा फटका बसणार तेवढा मतदानातूनही बसणार हे उघड सत्य आज मित्तीला तरी नाकारता येणार नाही. मराठवाड्यामध्ये आजही स्व.गोपीनाथ मुंडेंना मानणारा वर्ग आहे. हे जेवढे नाकारता येत नाही तेवढेच भाजपातून बंडखोरी करणारे रमेश पोकळे
स्व.मुंडेंचा पुतळा
सोबत घेवून

या निवडणूकीत रणशिंग फुंकत आहेत. मैदानात उतरून निवडणूक लढत आहेत. ते स्वत:च्या जीवावर निवडणूक लढवत असतील का? भाजपाचे माजी अध्यक्ष म्हणून आणि स्व.मुंडेंसह माजी मंत्री पंकजा मुंडेंचे खंदे समर्थक म्हणून रमेश पोकळेंकडे पाहिलं जातं. मग रमेश पोकळेंची बंडखोरी ही पोकळेंची वैयक्तिक आहे का? यांच्या उमेदवारीमागे नेमके कोण आहे? याची जाहिर चर्चा होत असल्याने भाजपातलं अंतर्गत धोरण हे मी किती श्रेष्ठ आणि मोठा हे दाखवण्यासाठी आहे असं म्हटलं तर सध्या तरी चुकीचं ठरणार नाही. स्व.मुंडे साहेबांचा मी कार्यकर्ता आहे असं म्हणत रमेश पोकळे आश्‍चर्य कारक निकाल लागेल असे आत्मविश्‍वासाने सांगत असल्यामुळे तो अश्‍चर्यकारक निकाल काय असेल? हे पदवीधरांनाच नाही तर सर्व सामान्य मतदारांनाही कळून चुकला आहे. एक तर भारतीय जनता पार्टी उमेदवार देतांना नेतृत्वात असलेला असंतोष, भाजपात झालेली बंडखोरी, प्रचार अवघा १० दिवसाचा असतांना बोराळकरांचा न दिसणारी प्रचार यंत्रणा हे सर्व भाजपाच्या उमेदवाराला पराभवाच्या पारड्यात ठेवणारं चित्र दिसून येतं. रमेश पोकळे यांची उमेदवरी म्हणजे कोणाची उमेदवारी हे समजायला आणि उमजायला पदवीधर मतदारांना वेळ लागणार आहे का? मग रमेश पोकळेंना मतदान करून निष्ठा, प्रेम दाखवायचे की आपले मतदान वाया जाणार नाही याचा विचार करत विजयाकडे घोडा दौड करणार्‍या उमेदवाराला निवडूण द्यायचे एवढी समज तर पदवीधारांना असणार आहेच. म्हणूनच २ टर्म औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे नेतृत्व करणारे सतिष चव्हाण यावेळेस महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पुन्हा रिंगणात आले आहेत. विद्यमान नेतृत्वावर काम करण्याची जबाबदारी असते. काम करतांना एखाद दुसरी चूक होत असते, लोक नाराजही असतात अशा वेळी त्या मतदार संघाचं नेतृत्व करणार्‍या व्यक्तीला अधिक जोखमीने निवडणूकीला सामोरे जावे लागते. इथे ही सतिष चव्हाण हे किती अकार्यक्षम आहेत हे दाखवण्याचा प्रयास मध्यंतरी झाला खरा परंतू तो प्रयास भाजपाच्या अंतर्गत बंडाळीत वाहून गेला अन् सतिष चव्हाणांचा
विजयाचा रस्ता
मोकळा झाला असं आज मित्तीला तरी जाहीर म्हणायला हरकत नाही. दोन टर्म या मतदार संघाचं नेतृत्व करतांना पदवीधरांचे, शिक्षकांचे प्रयत्न मांडतांना आणि ते प्रश्‍न सोडवतांना गेल्या दहा वर्षाच्या कालखंडात सतिष चव्हाणांना काही ठिकाणी यश तर काही ठिकाणी अपयश आले असले तरी मतदार संघाचं नेतृत्व करतांना पक्षासह पक्षाबाहेरील लोकांबरोबर पदवीधरांना सोबत घेण्याची हातोटी सतिष चव्हाणांना विजयाच्या चौकटीपर्यंत नेवून ठेवते. भाजपात झालेली अंतर्गत बंडाळी आणि राज्यात झालेली महविकास आघाडी सतिष चव्हाणांच्या पारड्यात मताचा गठ्ठा टाकणारी ठरेल. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षात प्रत्येक निवडणूकीत संयम सुचकतातर आहेच उलट जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कसे जाता येईल आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडुण कसे आणता येईल याचा जो पर्यंत त्यांच्याकडून होत आहे तो प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून होत नाही. मतदार संघामध्ये यावर्षी ३२ ते ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने या निवडणूकीत चुरस निर्माण होईल असे वाटत असतांना भाजपातील अंतर्गत बंडाळी अन् बोराळकर यांची अपरिपक्व प्रचार यंत्रणा सतिष चव्हाण यांच्या पथ्यावर चांगलीच पडतांना दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे ही निवडणूक पदवीधरांची आहे. मतदार हा पदवीधर आहे आणि
पदवीधर मतदार

हा कुठल्या भुलथापांना बळी पडणारा नाही. कारण तो वाचक आहे, सामाजिक, राजकीय, आर्थिक विषयाचे त्याला चांगले ज्ञान असते. पक्षापेक्षा, माणसाचे महत्त्व त्याला कळते, कोण आपले प्रश्‍न सोडवू शकतो? कोण नेतृत्व करण्या लायक आहे? याची जाण या मतदारांना क्षणोक्षणी राहते. म्हणूनच पदवीधर मतदार हा या निवडणूकीत अहंमपणा, अहंकारपणा, अंतर्गत गटबाजी या स्वार्थी विषयांना दुर्लक्षित करून नेता निवडतील हे यातून उघड होते. भाजपात ज्या पद्धतीने पक्षापेक्षा व्यक्तीला महत्त्व देणे सुरू झाले आणि तिथेच भाजपाच्या पराभवाचे सुत्र विरोधकांच्या लक्षात येवू लागले. आणि त्या पद्धतीने महाविकास आघाडीचा उमेदवार आपली प्रचार यंत्रणा राबवत आहे. त्या तोडीस भाजपाची प्रचार यंत्रणा अद्यापही दिसून येत नाही. त्यामुळेच भाजपाला लाईक करणार्‍या मतदारात कोणता झेंडा घेवू हाती हा प्रश्‍न सतावतांना दिसून येतो. मग तो माजी मंत्री पंकजा मुंडेंचा झेंडा घ्यायचा की भाजप नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीसांचा? औरंगाबाद पदवीधर निवडणूकीत सतिष चव्हाण विरूद्ध शिरीष बोराळकर अशी निवडणूक असली तरी खरी निवडणूक ती फडणवीस विरूद्ध मुंडे अशी तर नाही? अशी शंका ही आता पदवीधरात व्यक्त होतांना दिसून येते. त्यामुळे आता येणार्‍या दहा दिवसात या सर्व प्रश्‍नांची उत्तर मिळतील.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!