दोन तास मृतदेह पटरीवर; रेल्वे पोलिसांसह स्थानीक पोलीस असंवेदनशील
मृतदेह कचर्याच्या गाडीत उचलला
रेल्वे वाहतूक तीन तास ठप्प
प्रवाशांचे प्रचंड हाल
परळी (रिपोर्टर) हैद्राबाद-औरंगाबाद रेल्वेखाली एका व्यक्तीचा चिरडून मृत्यू झाला. सदरील अपघाताची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली. मात्र सदरची घटना ही परळी रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडली की, स्थानिक पोलिसांच्या हद्दीत, यामुळे दोन्ही पोलीस घटनास्थळावर तत्काळ गेले नाहीत. त्यामुळे परळी रेल्वे मार्गावरील रेल्वेची वाहतूक दोन तास ठप्प होती. दोन रेल्वे गाड्या परळी स्थानकावर उभ्या होत्या. त्यातील प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. दोन तासानंतर रेल्वेखाली चिरडलेल्या व्यक्तीचा मृतदेह अॅम्ब्युलन्समध्ये घेऊन न जाता कचरा गाडीत घेऊन गेल्याने तेथील रेल्वे पोलीस व स्थानिक पोलिसांची असंवेदनशीलता दिसून येते. सदरची घटना ही परळी रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या क्रॉसिंग पॉईंटवर बरकतनगर गेट जवळ घडली. रेल्वे पोलिसांच्या महणण्यानुसार परळी शहरातील स्थानीक पोलिसांनी सदरचा मृतदेह उचलावा, आम्ही त्यांना मदत करू. स्थानीक पोलीस व रेल्वे पोलीस सदरचा मृतदेह उचलण्याबाबत एकमेकांवर चालढकल करत होते. त्यामुळे दोन तास मानवी मृतदेहाची अवहेलना झाली.
याबाबत अधिक असे की, परळी रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर बरकतनगर गेटजवळील रेल्वे क्रॉसिंग पॉईंटवर आज सकाळी हैद्राबाद-औरंगाबाद या रेल्वेखाली एका व्यक्तीचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या शरीराचे छिन्नविछिन्न तुकडे झाले. सदरच्या घटनेची माहिती परळी रेल्वे स्थानकावर गुराख्याने दिली. रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सदरील मृतदेह उचलण्याबाबत स्थानिक पोलिसांना सांगितले. मात्र परळी शहर पोलीस व संभाजीनगर पोलीस यांच्यात आणि रेल्वे पोलिसात कोणाची हद्द? यावर खेळ सुरू झाला. रेल्वे पटरीवर मृतदेह असल्याने सकाळचय दरम्यान या मार्गावरून धावणार्या अन्य दोन रेल्वे रेल्वे स्थानकावर अडकून पडल्या. रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस मृतदेह उचलत नसल्यामुळे तब्बल दोन तास प्रवाशांचे हाल झाले. अखेर सरशेवटी मृतदेह उचलण्याचा निर्णय झाला. सदरचा मृतदेह उचलण्यासाठी अॅम्ब्युलन्स न मागवता रेल्वे पोलीसांनी नगरपालिकेची घंटा गाडी बोलवली आणि त्या कचर्याच्या गाडीत मानवी मृतदेह उचलून नेण्यात आला. एकतर मृतदेह कोणी उचलायचा या वादावरून मृतदेहाची अवहेलना होत राहिली. पुढे तो उचलला आणि त्याला कचर्याच्या गाडीतून नेण्यात आले. यावरून स्थानीक पोलिसांची आणि रेल्वे पोलिसांची असंवेदनशीलता समोर आली. मानवी मृतदेहाची थेट अवहेलना होताना दिसून आली. मरणारा व्यक्ती कोण? त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.