गणेश सावंत -9422742810
“देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र” अशा आशयाची घोषणा भाजपाकडून केली जात असायची. आता मात्र याच घोषणेला काऊंटर करण्याचे काम शिंदे गटाकडून करण्यात आले आहे. “राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे” अशा आशयाची जाहिरात शिंदे शिवसेनेने करून भाजपासह दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीसांना चेकमेट दिलाय. ही जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून भाजपामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे भाजप व शिंदे सेनेत सर्वकाही अलबेल असल्याचे सांगणे कठीण होवून बसले आहे. खरे पाहिले तर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही प्रचंड इच्छावादी आहेत. त्यांच्या अशा, अपेक्षा पराकोटीच्या त्यामुळेच “देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्रच्या” जयघोषाला “राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे” ही घोषणा भेदण्यासाठी दिली जातेय का?
आजच्या प्रसंगावरून आम्हाला एक अभंग आठवतो. ‘आगी लावी घरा । मग वसती कोठे थारा ॥ तुका म्हणे वर्म । येरा नाचवितो भ्रम ॥’ तुकोबांच्या या दोन ओळीचा अर्थ जो स्वत:च्या घराला आग लावतो तो कुठे एकठिकाणी विसावा घेत असतो का? वर्म कळत नाही म्हणूनच लोकात भ्रम पैदा करणं हे त्याचे काम असते. हा अभंग एवढ्यासाठी याठिकाणी घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे खंदे समर्थक ठाकरेंच्या नंतर उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वात शिंदे यांनी काम केले. मात्र गेल्या वर्षभरापूर्वी शिंदेंनी शिवसेनेत मोठी बंडखोरी केली आणि ते थेट भाजपाला येवून मिळाले. हा प्रकार सत्ताकारणाचा होता. त्या सत्ताकारणामध्ये भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा मोठा हात असल्याचे उघडपणे सांगितले जाते. मात्र भाजपाने केवळ सत्ताकारणासाठी आणि शिवसेनेला नामशेष करण्याइरादे देवेंद्र फडणवीसांना वगळून बंडखोरी करून आलेल्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले. तेव्हा फडणवीसांनी शिंदेंच्या नावाची घोषणा केली खरी मात्र आपण सरकारच्या बाहेर राहून त्यांच्या सोबत असल्याचे सांगितले. परंतू थेट पक्षश्रेष्टीचा आदेश आल्यानंतर फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद स्विकारले. अन इथंच दोन इच्छावादी एका नावेमध्ये प्रवास करू लागले. पुढे पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंचा माईक ओढल्यापासून ते त्यांना न बोलू देण्यापर्यंत देवेंद्र फडणवीसांवर कमालीच्या टिका झाल्या. स्वत:ला बदलत फडणवीसांनी लोकांपुरते का होईना एकनाथ शिंदेंना पुढे करण्याचा प्रयत्न सातत्याने केला. मात्र इच्छाशक्तीची वाफ जेव्हा येते तेव्हा ओठातल्यापेक्षा पोटातले बाहेर पडते. ते एकट्या फडणवीसांच्याच नव्हे तर शिंदे गटाच्या लोकांकडूनही दिसून येते. आता हेच बघा आज महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या वर्तमानपत्रांमध्ये शिंदे सरकारकडून एक जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. त्या जाहिरातीमध्ये फक्त नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. शिवसेनेचा सिम्बॉल आहे. दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांचा साधा छोटासा फोटोही पानभर जाहिरात दिसून येत नाही. जाहिरातीचा ठळक मथळा ‘राष्ट्रामध्ये मोदी महाराष्ट्रात शिंदे’ असा आहे. खाली ‘अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे’ असे स्लोगन टाकत मतदान सर्व्हेक्षणानुसार भारतीय जनता पक्षाला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के जनतेने कौल दिला आहे. म्हणजे महाराष्ट्रातील 46.4 जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पून्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छूक आहे. मुख्यमंत्री पदाच्या सर्व्हेक्षणानुसार एकनाथ शिंदे यांना 26.1 टक्का जनतेने पून्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेने पून्हा मुख्यमंत्रीपदी पहायला आवडेल असे म्हटले आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील 49.3 टक्के जनतेने पून्हा या जोडीला पसंती दर्शवली म्हणत महाराष्ट्रातील जनतेचे आभार..! दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले आहेत.
वरिल जाहिरातीचा आधार घेतलाच तर आजही भाजप आणि शिंदे गटाकडे महाराष्ट्रातील केवळ 47 टक्के अथवा 49 टक्के लोक आहेत. म्हणजेच 51 टक्क्यापेक्षा अधिक लोक भाजपाच्या आणि शिंदेसेनेच्या विरोधात आहेत. खरे पाहिले तर भाजप सेनेच्या विरोधात किती लोक आहेत यापेक्षा या जाहिरातीमुळे देवेंद्र फडणवीसांचा आणि त्यांच्या समर्थकांचा जो तिळपापड झाला ते पाहण्यासारखे म्हणावे लागेल. कारण मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अधिक पसंती देण्यात आली आहे. गेल्या वर्षभराच्या कालखंडात शिंदे गट आणि भाजपात अंतर्गत वाद आणि मतभेद सातत्याने असल्याच्या बातम्या येतात. कधी भाजप पून्हा फडणवीस मुख्यमंत्री होणार असा सुर आवळते तर कधी शिंदे मुख्यमंत्री होणार अशी वातावरण निर्मिती अशा आशयाच्या जाहिरातीतून शिंदेगट करते. गेल्या काही दिवसापासून शिंदे गट आणि भाजपात कमालीची कटुता निर्माण झाल्याचे सातत्याने पहावयाला मिळते. त्याचेच उदाहरण म्हणजे शिंदेगटातील पाच मंत्र्यांना आवरा किंवा डिच्चू द्या अशी तंबी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचे वृत्त मध्यंतरी प्रकाशित झाले. ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी या पाच मंत्र्यांची नावे उघड केली. ही बातमी पेरण्यामागे फडणवीसांचा हात असल्याचा बोलबाला झाला. पाठोपाठ कल्याण आणि ठाण्यामध्ये जे की एकनाथ शिंदेंचे बालेकिल्ले आहेत त्याठिकाणी भाजपाने लोकसभेच्या जागेवर दावा केला आणि इथेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा.श्रीकांत शिंदे यांनी थेट राजीनाम्याची भाषा केली. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात सर्वकाही अलबेल आहे असे म्हणणं धाडसाचं की मुर्खपणाचं. असो पण आजच्या जाहिरातीतून माज़ीमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री यांनी स्वतःची टक्केवारी कडून घेतली म्हणा …
शब्दांची शस्त्र-टक्केवारीतले मुख्यमंत्री
गणेश सावंत -9422742810