रात्री साडे अकरा वाजता म्हसोबा फाटयाजवळ घडली घटना
बीड (रिपोर्टर): आपले कृषी दुकान बंद करून गावाकडे निघालेल्या एका 40 वर्षीय कृषीसेवा केंद्र चालकाला अज्ञात तीन हल्लेखोरांनी रस्त्यात अडवून रुमालात गोटे बांधून जबर मारहाण केली. लाथाबुक्क्यानेही मारल्याने कृषीसेवा चालक अनेक जागेवर फ्रॅक्चर झाला आहे. गंभीर मारहाणीत सतरा टाकेही पडले आहेत. हल्लेखोरांनी बुलेट, खिशातील मोबाईल आणि पैसे घेऊन पोबारा केला. ही घटना रात्री साडेअकरा वाजता बीड शहरापासून काही अंतरावर असलेल्या म्हसोबा फाट्याजवळ घडली.
बाजीराव रामकिसन सोनवणे (वय 40, रा. शहाजानपूर रुई) असे मारहाण झालेल्या कृषीसेवा केंद्र चालकाचे नाव आहे. सोनवणे यांचे नवगण राजुरी येथे कृषीसेवा केेंद्र आहे. रात्री साडे अकरा वाजता ते आपले कृषीसेवा केेंद्र बंद करून बुलेट क्र. एम.एच. 23 ए.व्ही. 6555 ने गावी जात असताना अज्ञात तीन हल्लेखोरांनी त्यांच्या बुलेटला दुचाकी आडवी लावली. हल्लेखोरांनी तोंडाला बांधलेले होते. काही कळायच्या आत रुमालात गोटे बांधलेले होते. त्या गोट्यांनी सोनवणे यांच्यावर प्रहार
केला. त्यानंतर खाली पाडून लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. हल्लेखोरांनी त्यांचा मोबाईल, खिशातील 2100 रुपये आणि बुलेट घेऊन तेथून पळ काढला. जखमी अवस्थेतील बाजीराव सोनवणे हे काही अंतरावर पुढे चालत हॉटेल सुखसागर येथे गेले, तेथील एका व्यक्तीचा मोबाईल घेऊन नातेवाईकांना आपबिती सांगितली. नातेवाईकांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांना बीड येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मारहाणीत ते अनेक जागेवर फ्रॅक्चर झाले आहे तर तोंडाला आणि डोक्याला गंभीर जखमा असून सतरा टाके पडले आहेत. ग्रामीण पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला असून पुढील तपास सुरू आहे.