Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमचकलांबा प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी जाळल्या, जिल्हा आरोग्य प्रशासनाचा हलगर्जीपणा; उच्चस्तरीय चौकशीची...

चकलांबा प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी जाळल्या, जिल्हा आरोग्य प्रशासनाचा हलगर्जीपणा; उच्चस्तरीय चौकशीची गरज


संबंधित सांगतात ते औषधाचे रिकामे बॉक्स, फोटो झुम करून पाहण्याची गरज
बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातलेले असताना आरोग्य प्रशासनाचा आणखी एक हलगर्जीपणा समोर आला असून गेवराई तालुक्यातील चकलांबा प्राथमिक आरोग्य केंद्रात चक्क औषधे जाळल्याची माहिती मिळाली असून या संदर्भात रिपोर्टरच्या प्रतिनिधीने पाठपुरावा केला असता आरोग्य प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन औषधाचे रिकामे बॉक्स जाळले असल्याची माहिती संबंधितांकडून
मिळाली आहे. परंतु जाळलेल्या ठिकाणी काही गोळ्यांचे अर्धवट भाग जाळलेल्या अवस्थेत फोटोमध्ये आल्याने संबंधित अधिकार्‍यांनी हा फोटो झूम करून पहावा, आणि स्वत:च आत्मपरिक्षण करावे की, औषधाचे रिकामे बॉक्स जाळले की, औषधच जाळले. यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी गरज असून सदरील औषधी एक्स्पायर झालेली असली तरी अशाप्रकारे एक्स्पायर औषधांची विल्हेवाट लावणे चुकीचेच आहे.
बीड जिल्हा आरोग्य विभागातील औषध भंडारातून बीड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांना औषधाचा पुरवठा होतो. औषधे कुणाला किती दिली? दिलेले औषधे किती दिवसात, किती ताररखेला एक्सपायर होणार तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांच्याकडे औषधाचा किती साठा उपलब्ध आहे हे ऑनलाईन पद्धतीने बीड औषध भंडार कार्यालयातील अधिकार्‍यांनाही दिसतो. परंतु आरोग्य प्रशासनाच्या काही अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे औषध जाळल्यासारखी प्रकरणे समोर येत आहेत. जाळलेल्या औषधांची मात्रा किती होती यापेक्षा ही औषधे प्राथमिक आरोग्य केंद्रात शिल्लक का राहिली ? जर शिल्लक होती तर त्यांनी वेळेवरच एक्सपायर होण्यापुर्वी बीड औषध भंडार विभागाला सूचना दिली होती का? किंवा शिल्लक साठा असल्याची माहिती आरोग्य विभागाला देऊन हे औषधी एक्सपायर आहे आणि याची विल्हेवाट लावायची आहे, असा पत्रव्यवहार केला का? जरी केला असला तरी औषधांची विल्हेवाट लावण्याची पद्धत चुकीची असून यासंदर्भात रिपोर्टरच्या प्रतिनिधीने मोबाईलवरून जिल्हा आरोग्य अधिकारी शेख रौफ, चकलांबा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी बनसोडे, बीड औषध भंडार विभागातील धाट आणि जोशी यांना यासंदर्भात माहिती दिल्यानंतर आरोग्य प्रशासनाने याविषयी कोणतेही गांभीर्य न दाखविता विषय आला-गेला सारखी भूमिका घेतली. मात्र रिपोर्टरच्या प्रतिनिधीने यासंदर्भात आपला पाठपुरावा सुरुच ठेवून जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांच्या वॉटस्‌ऍपवरून औषध जाळल्याचे फोटो पाठवून यासंदर्भात कारवाई करण्याचे सांगितले तसेच काळे यांना हा फोटो झुम करून पहावा, अशी विनंतीही करण्यात आली.
विल्हेवाटची पद्धत चुकीची
ज्या पद्दतीने चकलांबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातच औषधे जाळण्यात आली यासंदर्भात एका मित्राने ही बाब आपल्या मोबाईलमध्ये टिपली आणि रिपोर्टरच्या प्रतिनिधीला छायाचित्रे पाठवून संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी केली. जरी या औषधी एक्सपायर होत्या तरी नियमाने जिल्हा आरोग्य अधिकारी यांची परवानगी घेऊनच औषधांची विल्हेवाट लावता येते. कुठेतरी गावाबाहेर लांब खड्डा खांदून त्या खड्‌ड्यात एक्सपायर औषधी टाकून खड्डा पुर्णत: झाकून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण की, रहदारीच्या ठिकाणी औषधांची विल्हेवाट लावली तर त्यातून होणार्‍या प्रदुषणाने इतरांना नुकसान होऊ शकते. किंवा अर्धजळीत गोळ्या लहान मुलांच्या हातात गेल्यानंतर बाधा होऊ शकते. तरी आरोग्य प्रशासनाने या औषध जळीत प्रकरणाला दुर्लक्षित करू नये.

Most Popular

error: Content is protected !!