बीड (रिपोर्टर): स्वच्छता कर्मचारी आणि नगरपालिका प्रशासनात पगारीवरून तू तू मै मै सुरू आहे. मात्र यामध्ये शहरातील स्वच्छता रखडली आहे. अनेक भागात घंटा गाड्या वेळेवर येत नसल्याने नागरीक ओला आणि सुका कचरा रस्त्यावरच फेकतात त्यामुळे अनेक भागातील नाल्या तुंबल्या आहेत. त्या नाल्या साफ करण्यासाठी कर्मचारी येत नाहीत. घंटा गाड्याही येत नाहीत त्यामुळे शहरात प्रचंड घाण निर्माण होऊन दुर्गंधी सुटली आहे. अनेक भागात मान्सूनपुर्व स्वच्छताही रखडलेली आहे.
शहरातील अनेक भागात कचरा कुंड्या नाहीत. त्यामुळे नागरीक ओला आणि सुका कचरा घरात साठवतात, मात्र घंटा गाडीच वेळेवर येत नसल्याने तो कचरा किती दिवस घरात ठेवणार म्हणून काही नागरीक हा कचरा सर्रासपणे रस्त्यावर किंवा नाल्यात टाकून देतात. तो कचरा नाल्यात गेल्याने नाल्या तुंबतात. परिणामी नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे प्रचंड दुर्गंधी सुटत आहे. बीड शहरातील मित्रनगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून घंटा गाडी आलेली नाही. त्यामुळे येथील नागरीकांनी रस्त्यावर कचरा टाकला आहे. अशीच परिस्थिती शहरातील अनेक भागात आहे. नागरिकांनी कर्मचार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास नगरपालिकेने आमचे पैसे थकवले आहेत, त्यामुळे आम्ही काम बंद केले आहे, असे काही कर्मचारी नागरीकांना सांगतात. नगरपालिकेने तत्काळ घंटा गाड्या पाठवून शहर स्वच्छ करावे, अशी मागणी होत आहे.