मुंबई (रिपोर्टर): ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज मुंबईत ‘गद्दार दिन’ साजरा करण्यात आला. या वेळी पोलिसांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यासह कार्यकर्त्यांची धरपकड केली. त्यांना ताब्यात घेतले.
गेल्यावर्षी आजच्याच दिवशी म्हणजे 20 जून रोजी शिवसेनेत मोठी बंडाळी झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालेले होते. मात्र शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत 40 आमदारांना सोबत घेऊन भाजपाशी सलगी केली आणि महाविकास आघाडीचे सरकार उलथून टाकले. भाजपाच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यंमत्री झाले. आज या घटनाक्रमाला एक वर्ष पुर्ण होत असून ठाकरेंच्या शिवसेनेसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आजचा दिवस गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. पोलिसांनी गद्दार दिन साजरा करू नये म्हणून संबंधितांना नोटीसाही दिल्या मात्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज गद्दार दिन साजरा करण्यात आला. या वेळी ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे घोषणाबाजी करणार्या राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबूब यांना उचलून नेत गाडीत टाकले. या वेळी अन्य कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.