सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त उद्या जिल्हा दौर्यावर
बीड (रिपोर्टर): सामाजिक न्याय विभागाचे राज्य आयुक्त प्रशांत नान्नवरे उद्या बीड जिल्हा दौर्यावर येत आहेत. बलभीम कॉलेज येथे भारत सरकार शिष्यवृत्ती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणारी स्वधारा या व इतर बाबींच्या अनुषंगाने समान संधी केंद्र या विषयांवर बैठक घेणार आहेत.
सामाजिक न्याय विभागाच्या अनेक योजना आहेत. या योजनांना अधिकार्यांकडून कधी गती मिळत नाही तर कधी निधी कमी पडतो. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील सामाजिक न्याय विभागाचे सर्व सहाय्यक आयुक्त, जात पडताळणी समितीचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी आणि महाविद्यालयांमध्ये भारत सरकार शिष्यवृत्ती हाताळणारे महाविद्यालयांचे कर्मचारी या सर्वांची समान संधी केंद्र या विषयावर कार्यशाळा घेणार आहेत. प्रामुख्याने दोन-दोन वर्षे विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत नाही, स्वधारा योजनेअंतर्गतही दोन-दोन वर्षे विद्यार्थ्यांना निधी मिळत नाही. या सर्व बाबी आयुक्त उद्याच्या बैठकीत मार्गी लावतील का, असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांकडून विचारण्यात येत आहेत. त्यामुळे उद्याची बैठक ही महत्वपुर्ण आहे.