पाच दिवस प्रचंड मारहाण, अपहरणकर्त्यांनी 30 हजारासह फोन पे वरून 29500 रुपये लुबाडले, दिंद्रुड पोलिसात तक्रार देताच आणून सोडले
धारूर (रिपोर्टर): ट्रॅक्टर घेण्यासाठी घेतलेले दोन लाख रुपये परत केले नसल्याचा राग मनात धरत तिघा जणांनी एकाचे अपहरण करत थेट जालना जिल्ह्यातील रायगव्हाण गावात नेऊन एका शेतात बांधून टाकले. तब्बल पाच दिवस रोज पिडिताला बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती पिडितेच्या नातेवाईकांनी दिंद्रुड पोलिसांना दिल्यानंतर अपहरणकर्त्यांनी पिडितास दिंद्रुड येथे आणून सोडल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी तिघा जणांविरोधात अपहरणासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडिताला उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, धारूर तालुक्यातील कचारवाडी येथील अशोक अंतराम मंत्री याने कांदेवाडी येथील भरत ज्ञानोबा कांदे यांच्याकडून दोन लाख रुपये ट्रॅक्टर खरेदीसाठी घेतले होते. ते परत दिले नसल्याचा राग मनात धरून 20 जून रोजी दिंद्रुड नजदीक असलेल्या चाटगाव फाट्यावरून अशोकचे अपहरण भरत कांदे, सतीश कांदे, सुरेश ज्ञानोबा कांदे या भावंडांनी केले. अशोकचे वडील अंतराम मंत्री यांच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलिसात 21 जून रोजी गुन्हा दाखल झाला करण्यात आला.
जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात आष्टी शिवारातील एका केळीच्या बागेत लिंबाच्या झाडाला अपहृत अशोक मंत्री यास पाच दिवस बांधून ठेवले होते. उपाशीपोटी ठेवत अमानुष मारहाण करून 24 जून रोजी मध्यरात्री अशोकला दिंद्रुड नजदीक सोडण्यात आले. अशोकच्या शरीरावर गंभीर जखमा आहेत. बीड येथील शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू आहेत. संबंधित आरोपींचे पैसे यापुर्वीच दिल्याचे पिडित अशोक मंत्री यांनी माध्यमांना सांगितले. ज्या वेळी माझे अपहरण करण्यात आले त्यावेळी माझ्याजवळ 30 हजार रुपये होते. ते पैसे अणि फोन पे वरून 29 हजार 500 रुपये बळजबरीने घेतल्याचेही अशोक मंत्री यांचे म्हणणे आहे.