बीड (रिपोर्टर); मणिपूरमधील जातीय हिंसाचार व महिला अत्याचाराच्या निषेधार्थ आज स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) व डेमोक्रॅटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) या विद्यार्थी व युवक संघटनांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन केले.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील जवळपास तीन महिन्यांपासून ईशान्य भारतातील मणिपूर राज्य जातीय हिंसाचारामुळे अक्षरशः जळत आहे. त्या राज्यात दिवसेंदिवस हा हिंसाचार वाढत चालला आहे. दोन आदिवासी महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याची धक्कादायक घटना मानवतेला काळिमा फसणारी आहे. त्या महिलांवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल होऊन दोन महिने उलटून गेले. तरी प्रत्यक्ष कारवाईला वेग आलेला नाही.मानवी समाजाच्या संवेदनशील मनावर घाव घालणार्या त्या घटना आहेत. अशा भयंकर परिस्थितीमुळे तेथील लोकांचे जीवन हे मरण बनले आहे. अशा वाढत चाललेल्या हिंसक घटनांमुळे शेकडो घरे उध्वस्त झाली आहेत. मोठ्या प्रमाणात चर्च आणि मंदिरे खाक झालीत. 50 हजार लोकं विस्थापित झाली आहेत. शंभर पेक्षा जास्त लोकांचे प्राण गेले आहेत.याबाबत तेथील राज्यात आणि केंद्रामध्ये सत्तेत असलेले भाजप सरकार मात्र मूग गिळून गप्प बसले आहे. तेथील मुख्यमंत्री बिरेन सिंगचे भाजप सरकार या दंगली थांबवण्यात अपयशी ठरले आहे. भाजप सरकारची चुप्पी म्हणजे तेथील दोन समाजात द्वेष पसरवणारी आहे. अशा गेंड्याच्या कातडीच्या भाजपच्या केंद्र आणि मणिपूर राज्य सरकारचा एसएफआय व डीवायएफआय जाहीर निर्भत्सना करते.
मणिपूर राज्यातील जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी राजीनामा द्यावा. सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी. आणि तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व (पान 7 वर)
त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी एसएफआय व डीवायएफआय करत आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज दि. 28 जुलै 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे झालेल्या आंदोलनात एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, राज्य उपाध्यक्ष सत्यजित मस्के, डीवायएफआयचे बीड तालुका अध्यक्ष सुहास जायभाये, माजलगाव तालुका सचिव सुहास झोडगे, जनवादी महिला संघटनेच्या मीरा शिंदे, एसएफआयचे तालुका अध्यक्ष शिवा चव्हाण, तालुका सचिव विष्णू गवळी, जिल्हा कमिटी सदस्य युवराज चव्हाण, अक्षय वाघमारे , अमोल राठोड, अमोल सानप, प्रदुमन जाधव, विशाल पवार, दत्ता पवार, आरती साठे, रुक्मिणी नागपूरे, संकल्प साठे, गणेश कोकाटे, प्रवीण निसर्गंध, आदी सहभागी झाले होते.