स्थानिक गुन्हे शाखेची कारवार्ई
बीड (रिपोर्टर): मोबाईल शॉपी फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्या प्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने करून आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर, स्था.गु.शा.चे प्रमुख संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संजय तुपे, पो.ना. शेलार, नसीर शेख, दुबाले, सुरवसे, मराडे यांनी केली.
वडवणी शहरातील मोरया मोबाईल शॉपी गेल्या एक महिन्यापूर्वी अज्ञात चोरट्यांनी फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी वडवणी पोलिसात कलम 456, 380 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने केला. मोबाईल शॉपी फोडणारा आरोपी हा त्याच्या घरी रमाईनगर (ता. वडवणी) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या वेळी पीएसआय संजय तुपे यांनी आपल्या टीमसह त्याच्या घरी छापा मारला असता रोहीत संजय डोंगरे हा तेथे आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने वडवणी येथील मोरया मोबाईल शॉपी फोडल्याचे सांगितले व त्याच्याकडे मुद्देमाल पोलिसांना दिला. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.