चोरटा सीसीटीव्हीत, पोलिसांनी तात्काळ
संशयित पकडला
बीड (रिपोर्टर): बीड बसस्थानक परिसरात भुरट्या चोरांचा जागता पहारा पहावयास मिळत असून बसस्तानकामध्ये झोपलेल्या प्रवाशांच्या खिशातून मोबाईलसह पैसे चोरून घेताना चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला. चारेीची घटना पोलिसांना माहित झाल्यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला असता एका संशयिताला पकडले तेव्हा त्याच्याकडे बसस्थानकातल्या चोरीचा नव्हे तर रात्रीच घडलेल्या अन्य एका वाटमारीतील मोबाईल मिळून आला. सदरच्या घटना या रात्री घडलेल्या आहेत.
याबाबत अधिक असे की, बीड बसस्थानकात मोठ्या प्रमाणावर चोरट्यांचा वावर असतो हे सातत्याने समोर आले आहे. गेल्या आठवड्यातच चोरटे आणि एका पोलिसाचे लागेबांधे शहरवासियांसमोर आले होते. रात्री बसस्थानकामध्ये एक प्रवासी झोपलेला होता. तेव्हा चोरट्याने त्याच्या खिशातला मोबाईल आणि पैसे काढून घेतले. त्याला अटकाव करण्यासाठी गेलेल्या अन्य एका व्यक्तीला धक्का देऊन तो चोरटा पळून गेला. या घटनेची माहिती पोलिसांना झाली. तेव्हा पोलिसांनी त्या चोरट्याचा शोध सुरू केला असता एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडे बसस्थानकामधून चोरलेला मोबाईल आणि पैसे मिळतात का, यासाठी त्याची झाडाझडती घ्यायला सुरुवात केली असता त्या चोरट्याकडे एक मोबाईल मिळाला मात्र तो बसस्थानकातल्या व्यक्तीचा नव्हता तर बसस्थानकाच्या बाहेर रात्री एक चोरीची घटना घडलेली होती. वडवणी परिसरातले तीस वर्षीय सुनील कराड हे रात्री साडेअकराच्या सुमारास नातेवाईकांच्या घराकडे जात असताना अज्ञात दोघांनी त्यांच्या मोटारसायकलला धक्का देत कराड यांचा चावा घेत त्यांच्या जवळील मोबाईल हिसकावून पळ काढला होता. तो मोबाईल त्या चोरट्याकडे मिळून आला होता. या दोन्ही चोरीच्या घटनांवरून बसस्थानक व परिसरामध्ये चोरांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येते.