भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे, असा सतत दावा केला जात असतो, पण या पक्षाला देशातील काही राज्यात आणि केंद्रात इतर पक्षाची मदत घ्यावी लागते. एक पक्षीय सत्ता मिळवणं तसं अवघड, काँग्रेसच्या कार्यकाळात काही वर्ष एक पक्ष सरकार स्थापन झालं होतं. काँग्रेस नंतर 2014 साली भाजपाला प्रचंड बहुमत मिळाले होते, मात्र भाजपासोबत छोटे पक्ष होते. त्या पक्षाची काही ना, काही मदत भाजपाला झालेली आहे. भाजपाचा प्रवास उत्तर भारतात जोरदार राहिलेला आहे. उत्तर भारताने भाजपाला आता पर्यंत तारलेलं आहे. दक्षिण भारतात, भाजपाला अजुन तरी यश आले नाही. दक्षिण भाग हा प्रादेशीक पक्षांची चलती असणारा आहे. आगामी लोकसभा निवडणुका काही महिन्यावर आलेल्या आहेत. त्याची जोरदार तयारी सुरु झाली. भाजपाने जुळवाजुळवी सुरु केली. कोणत्या ना, कोणत्या माध्यमातून भाजपा 2024 च्या निवडणुकीच्या प्रचाराला लागला आहे. पंतप्रधान मोदी देशात दौरे काढत आहेत. विविध कामांचे उदघाटन करु लागले. विकासाचं काहीही होवू पण तिसर्यांदा सत्ता मिळवण्यासाठी भाजपा आगामी निवडणुकाच्या कामात गुंतला. भाजपासाठी विकासापेक्षा निवडणुका महत्वाच्या आहेत हेच भाजपाच्या कार्यतून दिसत आहे. मनिपुर जळतयं, ते अजुन शांत झालं नाही. एखादं राज्य काही महिने जातीय तणावातून भाजुन निघणं हे काही चांगलं लक्षण नाही.
इंडीया आघाडी
इंडीयन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स इंडीया आघाडीची स्थापना करण्यात आली. या आघाडीत 28 पक्षांचा सहभाग आहे. आता पर्यंत आघाडीच्या दोन बैंठका झाल्या. या दोन्ही बैठका यशस्वी झाल्या. तिसरी बैंठक मुंबई या ठिकाणी होणार आहे. त्याची तयारी सुरु झाली. इंडीया आघाडीत ज्या पक्षांचा समावेश आहे. त्यात प्रमुख पक्ष काँग्रेस, तृणमुल कॉँग्रेस, आप, समाजवादी, लालू यांचा पक्ष, ठाकरे गट, पवारांची राष्ट्रवादीसह अन्य असे पक्ष सहभागी झालेले आहेत. भाजपाच्या विरोधात या आघाडीने चांगलेच रान उठवले. आघाडीची बोलणी आणि वाटाघाटी सुरु आहेे. कोणाला किती जागा द्यायच्या याची चर्चा बैठकीतून होत आहे. पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरला नाही. काँग्रेसला पंतप्रधान पदात तितका इंट्रेस नाही, असं कॉग्रंेसने स्पष्ट केलं असलं तरी पद कोणाला नको असते? भाजपाला हारवणं हाच आमचा उद्देश आहे अशी भुमिका काँग्रेसने यापुर्वी मांडलेली आहे. काँग्रेसच्या वतीने राहूल गांधी हे आघाडीत प्रमुख भुमिका मांडत आहेत. काँग्रेससाठी राहूल हेच नेते आहेत. खरगे अध्यक्ष असले तरी मुळ काँग्रेस ही गांधी घराणेच चालवतात. आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला आपली पडलेली बाजु भरुन काढायची आहे. दोन्ही निवडणुकीत कॉग्रंेसची धुळधाण उडाली होती. राष्ट्रीय पक्ष दोन्ही निवडणुकीत फक्त पन्नास खासदारावरच येवून ठेपला होता. आगामी निवडणुकीत काँग्रेसला शंभराचा आकडा पार करायचा आहे. तशी व्युहरचना या पक्षाने सुरु केली आहे. एकटं लढण्या इतकं बळ काँग्रेसकडे नाही, त्यामुळे आघाडी स्थापन करुनच आपण आपली ताकद दाखवू शकतोत हा विचार काँग्रेस जणांनी केला असावा. इतर प्रादेशीक पक्षांना आघाडीच्या माध्यमातून आपलं वलय निर्माण करता येणार आहे. ममता सारख्या मुख्यमंत्र्यांना भाजपाने जाणीव पुर्वक त्रास दिलेला आहे. ममता आघाडीत राहून भाजपाला जशास तसे उत्तर देवू शकतात. लालू यादव यांना जेलमध्ये जाण्याची वेळ आली होती. याचा ते निवडणुकीच्या माध्यमातून वचपा काढू शकतात. सपाची ताकद कमी झाली होती. आघाडीत राहिल्यामुळे सपाची ताकद वाढू शकते. इतर काही छोटया पक्षांना आघाडीत गेल्यामुळे बळ मिळू शकते.
राज्य अस्थिर केलं !
महाराष्ट्र राज्याकडे केंद्रातील भाजपा सरकारचं लक्ष असतं. राज्यात 48 जागा खासदारकीच्या आहेत. गत निवडणुकीत सगळ्यात जास्त जागा भाजपाच्याच निवडून आल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेच्या जागा निवडून आल्या होत्या. काँग्रसेचा फक्त एकच खासदार निवडून आला. राष्ट्रवादी चारवर होती. गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा आपल्याकडे असाव्यात असं भाजपाला वाटतं. भाजपाने राज्यात आघाडीचं सरकार पाडून भाजपा, शिवसेना (शिंदे गट) असं सरकार स्थापन केलं. शिंदेे यांना फोडून भाजपाला शिवसेना संपवायची होती, तो डाव त्यांनी यशस्वी करुन दाखवला. शिवसेने नंतर भाजपाने राष्ट्रवादी फोडली. अजित पवार यांना आपल्या सोबत घेतलं. भाजपाला राज्य सरकार ताब्यात घेण्या बाबत तितकं देणं, घेणं नाही. त्यांना लोकसभेचे उमेदवार जास्त निवडून आणायचे आहेत. भाजपाच्या सोबतीला शिंदे, अजित पवार आहेत. त्यामुळे आपल्याला जास्त विरोध होणार नाही निवडणूक सोपी जाईल,असं भाजपाचं गणीत आहे. जनमत कोणाकडे जास्त हे सगळ्यात महत्वाचं आहे. भाजपाने राज्याच्या राजकारणात राडा करुन ठेवला, दोन पक्ष उध्दवस्त करुन तीन पक्षाचं सरकार स्थापन केलं हे कोणालाच आवडलं नाही. भाजपाची फोडाफोडी अजुन थांबली नाही. जे राज्यातील बडे नेते आहेत. त्यांना गळ घालण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. सगळ्याच पक्षातून नेत्यांना आयात करण्याची खेळी भाजपाने सुरु केली. या खेळीत भाजपाला किती प्रमाणात यश येईल हे आगामी काळात दिसून येईल. ही खेळी एक दिवस भाजपाच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही.
पवार, ठाकरेंची परिक्षा
जी अवस्था उध्दव ठाकरे यांची झाली तशीच अवस्था शरद पवारांची झाली. ठाकरे गटातील एक, एक मोहरा अजुन टिपला जात आहे. तसंच पवारांच्या बाबतीत होत आहे. तिसरा मंत्रीमंडळाचा विस्तार होणं बाकी आहे. या विस्ताराच्या वेळी पवारांच्या गटातील आणखी काही बडे नेते भाजपाच्या वळचणीला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंडीया आघाडीच्या बैठकीला पवार, ठाकरे दोघेही उपस्थित राहिले होते. ठाकरे सतत भाजपाच्या विरेाधात तीव्र शब्दात टिका करतात. ठाकरे यांना भाजपाला धडा शिकवायचा आहे. त्यामुळे ठाकरे आघाडीत सहभागी झाले. पक्षात फुट पडल्या नंतर ज्या आमदारांना निलंबीत करण्यात आले. त्या प्रकरणाची अजुन सुनावली झाली नाही. तारीख पे तारीख सुरु आहे. लोकांच्या जनमतावर ठाकरे याचं भवितव्य अवलंबून आहे. ठाकरे म्हणजेच शिवसेना असं एक समीकरण आहे. शिंदे यांनी पक्ष बळकावला असला तरी त्यांना राज्यातील जनता किती प्रमाणात साथ देईल हे येत्या काळात दिसेल? स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या असत्या तर त्यातून ताकद कळली असती. मात्र स्थानिकच्या निवडणुकी बाबतचा कोर्टाचा निकाल अजुन लागलेला नाही. ह्या निवडणुका नेमक्या कधी होतात हे सांगणं अवघड आहे. इतका विलंब निवडणुका घेण्यासाठी होत असेल तर हे भारतीय लोकशाहीचं दुर्देेव नाही का? भाजपासाठी पोषक वातावरण नाही म्हणुन निवडणुका घेतल्या जात नाही का असा प्रश्न उपस्थित होवू लागला. शरद पवार राज्याचा दौरा करु लागले. दौर्यातून ते पुन्हा जनतेला आपलस करु लागले. पवार यांचे वय होऊन ही तरुणासारखे राजकारणात सक्रीय झाले आहे. पवार आणि ठाकरे यांना येणार्या निवडणुकीत आपल्या पक्षाची ताकद दाखवायची आहे. राज्यातील आघाडी अजुन मजबुत आहे. पवार, ठाकरे यांच्या सोबत कॉग्रंेस पक्ष आहे. एका बाजुने ही आघाडी आणि दुसर्या बाजुने ती आघाडी असा सामना रंगेल.
आता भाजपाला गरज का भासू लागली!
भाजपाचे लोकसभेतील दोन्ही निवडणुकीतील यश पाहता, भाजपाला प्रचंड गर्व चढला होता. आम्हाला कोणाची गरज नाही अशाच तोर्यात भाजपा वागत होता. काही प्रादेशीक पक्षाचं अस्तित्व भाजपाने संपवलं, आपल्या सोबत राहा नाही तर संपून जाल असाच इशारा भाजपा छोटया पक्षांना देत आला. नऊ वर्षात भाजपाने छोटया पक्षांची खच्चीकरण करण्याचं काम जाणीवपुर्वक केलं. 2024 च्या निवडणुका तोंडावर आल्या. तिसरी टर्म मोदी पंतप्रधान होवू पाहत आहे. पंच्याहत्तर वर्षानंतर नेत्याने निवृत्ती घ्यावी असं भाजपानेच यापुर्वी म्हटलं होतं. वयोमानाचा विचार करता, अडवाणी यांना बाजुला करण्याचं काम नव्या भाजपाच्या नेत्यांनी केलं. मोदी यांचं वय 75 झालं तरी त्यांना वाटतं तिसर्या वेळी पंतप्रधान व्हावं. ही निवडणुक भाजपा मोदी यांच्याच नेतृत्वाखाली लढवणार आहे. ज्या प्रमाणात यापुर्वीच्या दोन निवडणुका भाजपासाठी सोप्या गेल्या तशी ही तिसरी निवडणुक भाजपासाठी सोपी नाही. नऊ वर्षात बरचं काही घडलेलं आहे. मोदी यांनी जे आश्वासने दिली होती. त्यांची पुर्तता झाली नाही. बेरोजगारी कमी होण्याऐवजी वाढत गेली. महगाई कमी झाली नाही. यासह अन्य बरेच विषय आहेत, ते मार्गी लागले नाहीत. धार्मिक धुु्रवीकरण करुन जास्त दिवस निवडणुका जिंकता येत नसतात. भाजपाने आपल्या सोबतीला 38 पक्ष घेतले. इतके मोठे पक्ष सोबत घेवूनही भाजपा घाबरलेला आहे. कारण भाजपाला माहित आहे. येणारी निवडणूक आता एकतर्फी होणार नाही. इंडीया विरुध्द भाजपा आघाडी एनडीए अशी लढत होणार आहे. यात कोण भारी ठरतयं हे येत्या काळात दिसून येईल.