बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात नवीन औद्योगीक क्षेत्र निर्माण करण्यासाठी 11 हजार कोटींचे पॅकेज देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रीय क्रांती सेनेच्या वतीने मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रीय क्रांती सेनेचे अध्यक्ष परमेश्वर मुंडे यांनी केले.
बीड जिल्हा हा उद्योगापासून कोसो दूर आहे, शासनाच्या उदासीनतेमुळे बीड जिल्ह्यात मोठमोठे उद्योग उभारले जात नाहीत. त्यामुळे बेरोजगार तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. साडेचार ते पाच लाख लोक ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात जात आहेत. मुंबई, औरंगाबाद, सुरत, नाशिक या ठिकाणी बीडचे बेरोजगार जावून आपला उदरनिर्वाह करत आहेत.
बीड जिल्ह्यातील तरुणांकडे चांगले टॅलेंट आहे, काम करण्याची उमेद आहे, परंतु औद्योगिक क्षेत्र नसल्याने ते इतर राज्यात अथवा जिल्ह्यामध्ये कामाला जातात. असं म्हणत परमेश्वर मुंडे यांनी बीड जिल्ह्याची वस्तूस्थिती शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील स्थानीक उद्योजकांना उद्योग निर्माण करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान देण्यात यावे, या ठिकाणी उद्योग उभारावेत म्हणून मोठमोठ्या उद्योगांना सवलती द्याव्यात. त्याचबरोबर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात उद्योग निर्माण व्हावेत यासाठी 11 हजार कोटींचे पॅकेज घोषीत करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. हजारोंच्या संख्येने युवक बेरोजगार या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. शासनाने मागणीची गंभीर दखल न घेतल्यास पुढील आंदोलन तीव्र स्वरुपाचे करू, असा इशाराही राष्ट्रीय क्रांती सेनेच्या वतीने देण्यात आला. या वेळी क्रांती सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सुशिक्षित बेरोजगार तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.