एकनाथराव शिंदे नंतर भाजपाला अजित पवार यांच्या रुपाने तगडा नेता मिळाला. अजित पवार हे शिंदे यांच्या पेक्षा दहा पटीने उजवे आहेत. शिंदे यांचा वापर भाजपाला आज पर्यंत करता आला. शिंदे यांच्यामुळे शिवसेना फुटली. पक्षाचं वाटोळं झालं. जे भाजपाच्या मनात होतं, ते झालं. शिवसेनेची कधी वाट लागते याचा विचार भाजपा काही वर्षापासून करत होती. शेवटी जे व्हायचं तेच झालं. शिंदे यांच्या बंडामागे भाजपाच हात होता हे लपून राहिलेलं नाही. राष्ट्रवादीचे अजित पवार सत्तेत गेले. त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले. त्यामुळे शिंदे व त्यांच्या टीमची चांगलीच गोची झाली. अजित पवारांच्या कारभाराला कंटाळून आम्ही भाजपा सोबत गेलो होतोत असं वर्षभर शिंदे आणि त्यांची कंपनी सांगत होती. ज्यांच्यामुळे आम्ही फुटलो तेच आज सत्तेत येवून बसल्याने शिंदे समर्थकांना बोलायला तोंडच राहिलं नाही. काय बोलावे आणि कोणती प्रतिक्रिया द्यावी हे त्यांना समजेना. बोलायला काही नाही म्हणुन विकासाचा मुद्दा पुढे येवू लागला. विकासासाठी हे सगळं केल्याचं शिंदे व त्यांची टीम सांगू लागली. खोटं बोल पण रेटून बोल अशी अवस्था शिवसेनेच्या नेत्यांची व त्यांच्या आमदारांची झाली. आता नेमकी कोणती भुमिका घ्यावी हे शिंदे यांच्या गटाला कळेना? ठाकरे यांच्याकडे जावे तर जायला तोंड राहिलं नाही. त्याच्या चर्चा वेगळ्या होतील, याची भीती त्यांना वाटू लागली. ठाकरे यांच्याकडे शिंंदे समर्थक गेले तरी त्यांचे स्वागत होवू शकते, पण जनतेला नेमकं काय सांगणार हाच प्रश्न अवस्थ असलेल्या शिंदे समर्थकांच्या मनात दाटून आला असणार.
#आणखी विस्तार नाही!
हे सरकार बळच ओढून ताणून चालवलं जावू लागलं. राष्ट्रवादीतून जे फुटून भाजपा सोबत गेले, त्यातील निवडक नेत्यांना मंत्रीपदाची शपथ दिली. इतर जे काही आहेत ते वेटींगवर बसलेले आहेत. कोणाला मंत्रीपद मिळेल हे अजुन काही सांगता येत नाही. पावसाळी अधिवेशन झालं. अधिवेशनानंतर शपथविधी होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. अजुन तरी मंत्रीमंडळ विस्ताराच्या कुठल्याही हालचाली दिसून येत नाही. मुख्यमंत्री मंत्रीमंडळा बाबत काही बोलत नाहीत. त्यांना तशी बोलण्याची मुभा नसणार? कारण जे काही होतयं ते भाजपाच्या सांगण्यावरुन, भाजपा बोले आणि शिंदे हाले अशी त्यांची अवस्था झालेली आहे. राज्यात दुष्काळ सदृश्य परस्थिती निर्माण झाली. पावसाने खंड दिल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान होवू लागले. आणखी आठ ते दहा दिवस पाऊस झाला नाही तर, पिकं हातची जाणार आहेत. सध्याच्या परस्थिती बाबत राज्य सरकार तितकं गंभीर दिसेना. नुसता राजकीय धुराळा उडवण्याचं काम सुरु आहे. मुख्यमंत्री आपल्या पध्दतीने काम करतात. उपमुख्यमंत्री फडणवीस ते आपल्या पध्दतीने काम करतात. त्यामुळे राज्याच्या राजकारणात काही ताळमेळ राहिला नाही. तीन पक्षाचे सरकार हे विकासाला गती देतील असं भाजपाचे वरीष्ठ नेते नेहमीच सांगत असतात. विकास म्हणजे फोडा, फोडी करणं हे आहे की काय असाच प्रश्न पडू लागला? पुर्ण मंत्रीमंडळ नसल्यामुळे काही मंत्र्याच्याकडे जास्तीचे खाते आहेत. मंत्री मंडळाचा विस्तार झाला तर फुटाफुट होती की काय अशी भीती शिंदे, फडणवीस यांना वाटत असेल, त्यामुळेच मंत्रीमंडळाचा विस्तार लांबवला जात आहे की, काय?
#ईडीला घाबरुन गेले!
ईडी, सीबीआय या तपासी संस्थांची अनेक नेत्यांनी चांगलीच धास्ती घेतली. एखाद्याकडे काहीच नसेल तर त्यांच्यावर कारवाई होईल का? कुठं तरी काही तरी चुकीचं होतयं हे मानायला हवं. पुढार्याकडे इतकी मालमत्ता येते कुठून? कुठलाही व्यवसाय नाही. असला तरी इतर व्यवसायीक तोट्यात आणि पुढार्यांचाच व्यवसाय कसा काय फायद्यात? ज्यांच्यावर कारवाया झाल्या. त्यांच्याकडे संपत्ती होतीच. त्याचा हिशोब त्यांना देता आला नाही. यात फरक इतकाच आहे की, भाजपाच्या नेत्याकडे संपत्ती असली तरी त्यांच्याकडे वाकडं बोट दाखवलं जावू शकत नाही. कारण त्यांच्याकडे सत्ता आहे. सत्तेचा गैरवापर करणं हे चुकीचच आहे. न्याय सगळ्यांना सारखा मिळाला पाहिजे. आपला असो की, परका. भाजपाने आपला विस्तार वाढवण्यासाठी दुसर्यांचे लेकरं सांभाळण्यास सुरुवात केली. भले ही लेकरं कसे की, असेना. त्या बाबत त्यांना काही देणं,घेणं नाही. त्यांना फक्त लेकरांची संख्या वाढवायची आहे. त्यात त्यांना दर्जा शोधायचा नाही. शरद पवार याचं नुकतचं एक वक्तव्य आहे की, हे सगळे ईडीला घाबरुन भाजपासोबत गेले. त्यांचं हे वक्तव्य बरोबर असू शकतं. कारण अजित पवार यांना जेलमध्ये पाठवण्याची भाषा अनेक वर्षापासून भाजपावाले करत होते. 2014 पासून फडणवीस पवार यांच्या बाबतीत पुरावे गोळा करत होते. अगदी गाडीभर पुरावे फडणवीस यांनी गोळा केलेले होते. आज फडणवीस यांना या गाडीभर पुराव्याची आठवण नाही. त्यांना फक्त सत्ता कायम टिकून ठेवायची आहे. अजित पवार आज तरी भाजपाच्या द़ृष्टीने स्वच्छ आहेत. विकासासाठी ते भाजपासोबत आले आहेत. असं सांगितलं जावू लागलं. यापुर्वी विकास पुर्णंता थांबलेला होता. आता तो सुसाट वेगाने धावतांना दिसून येत आहे, असंच म्हणावं लागेल. अजित पवार सह इतर जे काही नेते आहेत. त्यांची ही कुठं ना कुठं काही तरी चुकीची कामे झालेली असतील. त्यामुळे त्यांना घाम फुटलेला आहे. नवाब मलीक यांना नुकताच जमीन मिळाला. तो ही तात्पुरता. ईडीच्या फेर्यात आडकल्यानंतर लवकर जामीन मिळत नाही याचीच पुढार्यांना धास्ती आहे. त्यामुळे पुढारी जास्त घाबरलेले आहेत. जेलमध्ये जाण्यापेक्षा आपण भाजपा सोबत गेलेलं कोणतं वाईट आहे याचाच विचार केला जात आहे.
#पवारांचे राज्यात दौरे
शरद पवार याचा पक्ष फुटल्यानंतर पवार तितके घाबरलेले नाहीत. कारण पवारांना अशा गोेष्टी नवीन नाहीत. उध्दव ठाकरे यांच्यासारखीच पवारांची अवस्था झाली. ठाकरे तरी थोडे अस्वस्थ होते. पवार अव्हांनाला तोंड देवू लागले. अजित पवारांच्या फुटीवर अजुन चर्चा होत आहे. अजित पवारांचे बंड खरे की खोटे? मध्यंतरी अजित पवार हे शरद पवारांना भेटले होते ते ही लपून, त्याची माध्यमात जोरदार चर्चा झाली होती. ही वयैक्तीक भेट होती, असं शरद पवाराचं म्हणणं होतं. त्यात काही तथ्य नव्हतं. असं ते म्हणाले आहेत. काही झालं तरी आपण भाजपा सोबत जाणार नाही अशी जाहीर भुमिका पवारांनी घेतली आहे. याचा अर्थ पवार आपल्या धर्मनिरपेक्ष विचारावर कायम आहेत. राजकारणात काही ही होवू शकतं? मात्र पवार तशी चुकीची भुमिका घेणार नाही असं अनेकांना वाटत आहे. पक्षाच्या वाढीसाठी आणि कार्यकर्ते जोडण्यासाठी पवार मैदानात उतरले आहेत. सभा घेणं आणि लोकांशी चर्चा करुन त्यांच्याशी संवाद साधणं हे काम जोरदारपणे पवारांनी सुरु केलं. पवारांच्या सभांना प्रतिसाद चांगला मिळू लागला. पवार भल्या, भल्यांना अस्मान दाखवू शकतात हे यापुर्वीच दिसून आलेलं आहे. यावेळचं आव्हान मोठं असलं तरी ते आव्हान सहज पेलू शकतात. कारण पवारांना मानणारा वर्ग राज्यात मोठा आहे. त्यांचा राजकारणात मोठा दबदबा आहे हे नाकारुन चालणार नाही.
#वड्डेटीवार यांचा दावा
अजित पवार सत्तेत गेल्यानंतर शिंदे यांच्या भवितव्य बाबत जोरदार चर्चा होत आहे. आता शिंदे जास्त दिवस टिकत नाहीत. त्यांचा कार्यकाळ संपत आला असं सांगितलं जावू लागलं. यात खरं ही असू शकतं. भाजपाला शिंदे यांची तितकी गरज राहिली नाही. निवडणुका काही महिन्यावर आलेल्या आहेत. भाजपासाठी लोकसभेच्या निवडणुका महत्वाच्या आहेत. लोकसभेपर्यंत शिंदे यांच्याशी भाजपाचे चांगले संबंध राहू शकतात. त्यानंतर बिघडलं तरी भाजपाला काही देणंघेणं नाही. कारण राज्यातील सत्तेचं जुगाड हे दिल्लीतून जमवण्यात आलेलं आहे. दिल्लीश्वरांना पुन्हा केंद्रात भाजपाची सत्ता आणायची आहे. देशात सगळीकडेच भाजपाच्या विरोधात बरच विरोधात वारं वाहतांना दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य हे महत्वाचं आहे. राज्यात 48 जागा लोकसभेच्या आहेत. त्यामुळे हे राज्य भाजपाला ताब्यात ठेवायचं आहे. शिंदे, अजित पवार हे महत्वाचे नेते आहेत. या नेत्याकडून आपला फायदा करुन घ्यायचा हेच धोरण भाजपाचं आहे. विजय वड्डेटीवार हे विरेाधी पक्ष नेतेे आहेत. त्यांचे एक वक्तव्य आहे. पुढील महिन्यात शिंदे जावू शकतात? शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवारच मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसू शकतात. शिंदे यांच्यापेक्षा भाजपाला अजित पवार यांच्याकडून जास्त फायदा आहे. अजित पवार हे पश्चिम महाराष्ट्र हालवू शकतात. इतकी त्यांची ताकद आहे असा विश्वास भाजपाला आहे. त्यामुळे शिंदे यांना हाटवून भाजपाने अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवलं तर नवल वाटण्यासारखी बाब नाही. नंतर शिंदे याचं काय करायचं? त्यांना वेगवेगळी आश्वासने दिली जावू शकतात, नाही ऐकलं तर शेवटी ईडीचं अस्त्र आहेच? निवडणुकीपर्यंत शिंंदे कायम राहिले तर भाजपाने इमानदारी पाळली असं म्हणावं लागेल!