दादांच्या व्यासपीठावर
योगेश क्षीरसागर बोलणार
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बीडमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत गेल्या तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे योगेश क्षीरसागर यांना सभेच्या कार्यक्रम पत्रिकेत स्थान देण्यात आले आहे. ते बीड विधानसभा मतदारसंघाविषयी आपले मत मांडणार आहेत. त्याचबरोबर मतदारसंघाला काय हवे आहे, हे उपमुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांसमोर मांडणार आहेत. दुसरीकडे योगेश क्षीरसागर यांच्याकडेच सर्व मंत्र्यांच्या भोजनाची व्यवस्था असल्याने तेथील व्यवस्थाही अत्यंत चांगली झाली आहे.
रस्त्यांवर माणसांचा महापूर
श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून अवघ्या मिटरच्या अंतरावर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर अजितदादांची सभा होत आहे. सभास्थळी येण्यासाठी जालना रोड, नगर रोड, बार्शी रोड, बशीरगंज या चार प्रमुख रस्त्यांवरुन माणसांना यावे लागते. या चारही रस्त्यांवर दुपारी माणसांचा महापूर पहावयास मिळत होता.
शहरातल्या पुतळ्यांना
फुलांची सजावट
सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची, अस्मितेची, सन्मानाची अन् दुष्काळ मिटवण्यासाठीची असे घोषवाक्य करत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा बीडमध्ये होत आहे. तत्पूर्वी शहर नटले, सजले. या उत्साहात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शहरातील विविध संत-महात्मे, समाजसुधारक यांच्या पुतळ्याला फुलांनी सजवले. राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, संत बसवेश्वर यांच्यासह शहरातील प्रत्येक पुतळ्याला फुलांची सजावट आणि पुष्पहार अर्पण केल्याचे दिसून आले. असे याआधी कुठल्याही सभेपूर्वी दिसून आले नव्हते.
महिलांची संख्या लक्षणीय
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्राच्या अर्ध्या मंत्रिमंडळाला ऐकण्यासाठी आजच्या सभेमध्ये लक्षणीय महिलांची उपस्थिती दिसून येईल, शहरात मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग डेरेदाखल होत आहेत. विकासाचा ध्यास घेऊन ना. मुंडेंनी दुष्काळ हटवणे आणि बीड जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर नेणे हे धोरण आखल्याने त्यांच्या हाकेला जिल्ह्यातील महिलांनी साद दिली आहे.