संकटकाळात जो साथ देतो तोच खरा आपला माणूस असतो – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
बीड (रिपोर्टर)ः- सुख दुःख हे रोज चालणारे चक्र आहे यामध्ये प्रत्येक जण एकमेकांच्या बरोबर राहतात मात्र संकट काळात जो साथ देतो तोच खरा आपला माणूस असतो असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
बीड शहरातील मीना फंक्शन हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मुस्लिम बांधवांच्या बैठकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, फहीम मास्टर, खाजा बॉस, पठाण मुक्रम जान, हाफीज मोईन, जमील भाई, शेख जमील भाई, शाहबाझ शेख, हकीम जलील शेख, बाबू भाई, नसीर सरपंच, डॉ जफर अली,डॉ अतीक,पठाण नयीम,व पत्रकार बांधव यांच्यासह शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, रोजच्या जीवनामध्ये सुखदुःख येतात त्याचप्रमाणे सामाजिक आणि राजकीय जीवनात देखील चढउतार येतच असतात संकटकाळी जो माणूस आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो तोच खरा आपला माणूस असतो. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे बीडमध्ये त्यापेक्षा काही वेगळं सुरू नाही.
राजकारण करत असताना मी कधीही जात आणि धर्म पाहिला नाही कारण येणारा प्रत्येक जण हा आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने येत असतो, मी विकासाची कास कधी सोडली नाही जमेल ते प्रयत्न करून लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून मिळणार्या सुविधा असो की इतर दुसर्या सुविधा मी चार वेळा आमदार व तेरा वर्षे मंत्री असताना कधीही धर्म जात पाहिली नाही सर्वांना सर्व सुख-सोयी, सुविधांचा लाभ मिळावा यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. ज्यांनी मतदानाच्या वेळी मला साथ दिली त्यांच्यासाठी पण कार्य केले व ज्यांनी मला साथ नाही दिली त्यांच्यासाठी पण कार्य केले, आज सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात विष कालविण्याचे प्रयत्न केले जात आहे. आपल्याला बळी पडायचे नाही हे लक्षात ठेवा, मी 350 हून अधिक मुस्लिम बांधवांसाठी घरकुल मिळवून देण्याचे कार्य केले, आता मोमीनपुरा कडे जाणारा बिंदुसरा नदीवर पुल आवश्यक आहे त्यासाठी भरपूर प्रयत्न सुरू आहेत व तो होणारच, मी जेव्हा केव्हा माझ्या राजकीय भवितव्याविषयी जो काही निर्णय घेईल तो सर्वांना विश्वासात घेऊन विचारात घेऊन निर्णय घेईन माझ्यासाठी विश्वास महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी हे सर्व बांधव रक्ताच्या नात्याहून जास्त घट्ट नात्यातले आहे. चांगल्या काळात कोणीही साथ देतो वाईट काळात जो साथ देईल तोच खरा आपला माणूस असतो.
असे सांगताच उपस्थित हजारो मुस्लिम बांधवांनी आण्णा तुम्ही कोणत्याही पक्षात जा आम्ही आपल्या पाठीशी आहोत असा निर्धार व्यक्त करून घोषणाबाजी केली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक मुखीद लाला यांनी केले तर सूत्रसंचलन शेख अजीज यांनी केले. आभार प्रदर्शन खाजा बॉस यांनी केले.