चार मुले बीडच्या तर एक अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल
नवनाथ कांबळे/दिंद्रुड : (रिपोर्टर): माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड मध्ये डेंग्यूने थैमान घातले असून, येथील खासगी दवाखान्यातून बीड येथे शासकीय व खासगी रुग्णालयात चार लहान मुले व अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात एका मुलाला दाखल करण्यात आले आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत तर गावातील आरोग्य प्रशासन (आरोग्य उपकेंद्र) मात्र सुस्त आहे. फवारणी व डास निर्मूलन होत नसल्याने आजाराचे प्रमाण वरचेवर वाढत आहे.
यावर्षीची दुष्काळी स्थिती व अल्प प्रमाणात पडलेल्या पावसामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, मोठेमोठे डास नाल्यावर व इतर घाणीवर पसरलेले आढळतात. डेंग्यूचे आक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायत ने ठोस कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावातील पाचखणी, पेठ गल्ली, जैन गल्ली आदि भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव लहान मुलांवर झाला आहे. नालीतील डासांच्या अंड्याचा नायनाट होण्यासाठी गेल्या सोमवारी नाल्यात पावडर टाकले आहे. ग्रामपंचायत कडे एक फॉगिंग मशीन उपलब्ध असून, इतर दोन मशीनची सोय करून आज सायंकाळी पाच वाजता गावातील प्रत्येक भागात औषध फवारणी करणार आहोत. रोगराई संपुष्टात आणण्यासाठी ग्रामस्थांनी स्वच्छता राखावी यासाठी ग्रामपंचायत मार्फत जनजागृती करणार आहोत. गावात फवारणी व डास निर्मूलन तातडीने करत आहोत. असे बिभीषण डोरले (ग्रामसेवक) व सरपंच अजय कोमटवार यांनी सांगितले.