मुक्ताई आज बीड मुक्कामी
बीड (रिपोर्टर) विठुमाऊलीच्या दर्शनाची आस लागलेल्या संतांचे पाय वारकर्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे चालते झाले असून गेले अनेक दशकापासून श्रीक्षेत्र मुक्ताईनगर खान्देश येथून विठुमाऊलीच्या दर्शनासाठी निघालेल्या संत मुक्ताबाईंची पालखी आज शहरात डेरेदाखल झाली. संत मुक्ताईंचे उत्साहात आणि जल्लोषात बीडकरांनी स्वागत केले. आज संत मुक्ताई बीडमध्ये दोन दिवस मुक्कामी असून परवा 26 जून रोजी पहाटे 6 वाजता बीडमधून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
मृदंगावर थाप, टाळांचा गजर, विठ्ठल नामाच्या निनादात संत मुक्ताईंची पालखी बीडच्या सीमेवर आली. बीडकरांनी मोठ्या उत्साहात मुक्ताईंच्या पालखीचे स्वागत केले. विठू नामाच्या गजराने अवघे बीड शहर दणाणून गेले. ठिकठिकाणी पालखीतील वारकर्यांसाठी खाण्या पिण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आरोग्य शिबीराचे नियोजन करण्यात आले होते. आज पालखी बीडमध्ये मुक्कामी आहे. मुक्ताई दोन दिवस बीडमध्ये भक्तांच्या सानिध्यात राहतात. उद्या 25 जून रोजी पेठ बीडमधील बालाजी मंगल कार्यालय, जुना मोंढा बीड येथे पालखी मुक्कामी असणार आहे. तर परवा पहाटे 6 वा. मुक्ताईंची पालखी पंढरपूरकडे रवाना होणार आहे. हजारो वारकर्यांनी विठ्ठल भक्तांनी आज मुक्ताईंचे दर्शन घेतले.