माजलगावात 11 ते मांजरात
23 टक्के पाणीसाठा
बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये दुष्काळीसदृश्य परिस्तिती निर्माण झाली. अजूनही दमदार पाऊस पडला नसल्याने धरणात पाण्याचा साठा राहिलेला नाही. बोटावर मोजण्याइतकाच धरणामध्ये पाणीसाठा शिल्लक आहे. दोन दिवसांपासून मराठवाड्यात कुठे ना कुठे मध्यमस्वरुपाचा पाऊस पडत अहे. काल जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. या पावसामुळे पिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी आगामी काळाचा विचार करता धुव्वाधार पावसाची गरज आहे.
सलग तीन वर्षे मराठवाड्यात चांगला पाऊस पडल्यानंतर यंदा मात्र पावसाने हुलकावणी दिली. खरीप पिकाचं 50 टक्के नुकसान झालं. दमदार पावसाची शेतकरी आतुरतेने वाट पहात आहेत. दोन दिवसांपासून मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा तर काही ठिकाणी मध्यमस्वरुपाचा पाऊस पडू लागला. बीड जिल्ह्यात रात्री काही मंडलांमध्ये पिकांना जीवदान देण्यापुरता पाऊस पडला. या पावसामुळे खरीप पिकांना थोडा दिलासा मिळाला असला तरी पिण्याच्या पाण्याचे संकट कायम आहे. मराठवाड्यातल्या बोटावर मोजण्या इतक्या धरणात पाण्याचा साठा थोडा बरा असून इतर धरणे कोरडे पडले आहेत. माजलगावात 11.54, मांजरा 23.86, येलदरीत 61.48, सिद्धेश्वरमध्ये 59.9, मानारमध्ये 60.73, तेरणा 25, विष्णूपुरीमध्ये 90 टक्के पाण्याचा साठा आहे. 11 धरणात एकूण 44.99 टक्के पाण्याचा साठा आहे.