बीड (रिपोर्टर)- राज्य सरकारने शिक्षण कायद्याची पायमल्ली करून कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षण प्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शासनाच्या निषेधार्थ आज सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाआरती आंदोलन केले. या वेळी अनेकांची उपस्थिती होती.
दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने शिक्षणाच्या बाबतीत चुकीचा निर्णय घेतला. कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील 14 हजार शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शासनाचा निर्णय हा सर्वसामान्य मुलांना शिक्षणापासून वंचीत ठेवणारा आहे. शासनाच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाआरती आंदोलन करण्यात आले. सरकारचा निर्णय तुघलकी असून तो रद्द करण्यात यावा, तशी बुद्धी गणरायाने शासनाला द्यावी यासाठी लक्षवेधी महाआरती आंदोलन करण्यात आले. या वेळी डॉ. गणेश ढवळे, मनोज जाधव, शेख युनुस, रामनाथ खोड, किश्किंदा पांचाळ, अशोक येडे, रामधन जमाले, सुदाम तांदळे, शेख मुबीन, शेख मुश्ताक, धनंजय सानप, शिवशर्मा शेलार यांच्यासह आदींची उपस्थिती होती.