बीड जिल्ह्यातील शहीद जवान पांडुरंग तावरे यांना सिक्कीममध्ये वीरमरण, पालकमंत्री धनंजय मुंडेंनी केले दुःख व्यक्त; सिक्कीम मधील ढगफुटीनंतर बेपत्ता झाल्यावर राबवली होती विशेष शोधमोहीम
बीड (दि. 08) – बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील काकड हिरा गावचे वीर शहीद जवान पांडुरंग तावरे हे सिक्कीममध्ये झालेल्या ढगफुटी दरम्यान आपत्कालीन परिस्थितीत देशसेवेत असताना शहीद झाले.
बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र पांडुरंग तावरे हे देशसेवेत अमर झाले आहेत, त्यांना मी वंदन करतो, अशा भावनिक शब्दात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शहीद जवान पांडुरंग तावरे यांना वीरमरण आल्याचे वृत्त समजल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त केले आहे, तसेच आपण तावरे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
चार दिवसांपूर्वी सिक्कीममध्ये ढगफुटी झाली. त्यादरम्यान गंगटोक परिसरात तिस्ता नदीला आलेल्या पुरात भारतीय सैन्य दलाच्या तुकडीतील 23 जवान पुरात वाहून बेपत्ता झाले होते. त्यांपैकीच पांडुरंग तावरे हेदेखील बेपत्ता होते. याबाबतचे वृत्त समजताच धनंजय मुंडे यांनी पांडुरंग तावरे यांचा शोध घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामी लावून, विशेष शोध मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या, तसेच तावरे यांच्या कुटुंबियांना देखील संपर्क करून धीर दिला होता. मात्र अखेरीस पांडुरंग तावरे यांना वीरमरण आल्याचे दुर्दैवी वृत्त आले. दरम्यान शहीद पांडुरंग तावरे यांचे पार्थिव आज विशेष विमानाने पुण्याला आणले जात असून, उद्या सकाळी काकडहिरा ता.पाटोदा येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण विभागाने दिली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शहीद पांडुरंग तावरे यांना आलेल्या वीरमरणा बद्दल दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली असून, देशसेवेसाठी दिलेले बलिदान अमर असल्याचे म्हटले आहे.