शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, बंदुकीच्या गोळ्या झाडून सलामी
पाटोदा (रिपोर्टर)- अमर रहे अमर रहे पांडुरंग तावरे अमर रहे’ ‘भारत माता की जय’ ‘वंदे मातरम्’ च्या घोषणा देत आज सकाळी काकडहिरा येथील शहीद पांडुरंग तावरे यांच्या पार्थीवदेहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेत पंचक्रोशीतील हजारो लोक साश्रू नयनाने सहभागी होते.
पाटोदा तालुक्यातील काकडहिरा येथील भारतीय सैन्या दलातील 18 महार रेजिमेंटचे शहीद जवान पांडुरंग तावरे हे पश्चिम बंगालच्या सहारा पारा दक्षिण जयपायगुडी येथे कर्तव्यावर असताना 4 ऑक्टोबर रोजी ढगफुटी झाली, या वेळी त्या ठिकाणची लष्कर छावणी वाहून गेली. या दुर्घटनेत अनेक जवान बेपत्ता झाले.
त्यात पांडुरंग तावरे यांचाही समावेश होता. लष्कराकडून करण्यात आलेल्या शोध मोहिमेनंतर पांडुरंग तावरे यांचा पार्थीवदेह मिळून आला. तो काल विशेष विमानाने पुण्यात आणण्यात आला आणि लष्करी वाहनाने तो त्यांच्या जन्मगावी काकडहीरा येथे आणण्यात आला. आज सकाळी त्यांचा पार्थीव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आला होता. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पांडुरंग तावरे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी अमर रहे अमर रहे पांडुरंग तावरे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम्च्या घोषणांनी अवघा परिसर दणाणून गेला होता. साश्रू नयनांनी हजारोंच्या संख्येने पंचक्रोशीतील लोक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. अंत्यविधीस्थळी शासकीय इतमामात सलामी देत तावरे यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी जिल्हाभरातील लोक प्रतिनिधी, पुढारी, डॉक्टर, वकील, कार्यकर्ते, पत्रकार, व्यापारी यासह सर्वसामान्य अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.