बीड (रिपोर्टर)ः- पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये 2021 साली पोलीस भरती झाली होती. या भरतीमध्ये राज्याभरातील हजारो तरुणांनी अर्ज दाखल केले होते. भरतीची प्रकिया पुर्ण झाली. त्यात काही जागा प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव होत्या. बीडमधून अनेकांनी बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र काढून भरतीमध्ये दाखल केलेले आहे. या प्रमाणपत्राची पडताळणी केली असता ते बोगस असल्याचे समोर आले. या प्रकरणी बीडसह इतर ठिकाणच्या दहा उमेदवारा विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
2021 साली पोलीस भरती झाली होती. या भरतीत बोगस प्रमाणपत्र दाखल करुन काही जण भरती झाले होते. हे बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र बीडमधून काढण्यात आले होते. बोगस प्रमाणपत्र काढणार्या विरोधात पूणे येथील चर्तुःशूंगी पोलीसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची फिर्याद उपअधिक्षक युवराज मोहीते यांनी दिले. या प्रकरणी सोमीनाथ सुधाकर कंठाळे रा.पाडळी ता.शिरुर जि.बीड, अजय बबु्रवान जरक रा. टाकळी ता.म्हाडा जि.सोलापूर, अक्षय बाळासाहेब बडवे रा.सोमनाथ नगर कोंडवा बु्र., दिनेश अर्जुन कांबळे रा.ब्रम्हगांव ता.जि.बीड, राजेश रमेश धुळे रा.नांदेड, अमोल विठ्ठल गरके, रा. बेंबर ता.भोकर जि.नांदेड, गोविंद भक्तराज मिटके रा.शिवणगांव ता.उमरी जि.नांदेड, आसाराम बाळासाहेब चौरे, रा.जिवाची वाडी ता.केज, हेमंत विठ्ठल निकम रा.दत्तविहार वाघोली जि.पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
हे प्रमाणपत्र दिले कोणी?
बोगस प्रमाणपत्र काढून देण्याची टोळी बीड जिल्हयासह इतर ठिकाणी कार्यरत आहे. या पूर्वीही बोगस प्रमाणपत्र दाखल करणार्या विरोधात विदर्भामध्ये गुन्हे दाखल झाले होते. आता पुन्हा तसाच प्रकार पुणे येथे पोलीस भरती प्रकियेत उघड झाला. हे बोगस प्रमाणपत्र बीडमधूनच दिले असल्याचे समोर आल्यानंतर ते दिले कोणी याचा शोध पोलीस प्रशासनाने दयायला हवा. बोगस प्रमाणपत्रामुळे काही जण शासकीय सेवेचा लाभ घेतात. आणि जे खरे प्रकल्पग्रस्त आहे ते मात्र वंचीत राहत आहे.