बीड (रिपोर्टर) गेल्या आठ दिवसांपासून महाऑनलाईन सेतु केंद्राचे सर्व्हर जाम झाल्यामुळे जातीचे, उत्पन्नाचे, रहिवासी असे हजारो विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र अडकलेले आहेत. नुकतेच दहावी आणि बारावी या दोन्ही शैक्षणिक महत्वाचा वर्षाचा निकाल लागलेला आहे. पुढील अॅडमिशनसाठी विद्यार्थ्यांना जातीचे आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्र महाऑनलाईनद्वारे काढावे लागतात. मात्र सर्व्हर गायब असल्याने विद्यार्थी आणि पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
इयत्ता अकरावी आणि प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी जातीचे, उत्पन्नाचे आणि इतर प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रवेश घेता येत नाहीत. इतर कोणत्याही शैक्षणिक प्रवेशासाठी ही प्रमाणपत्रे आवश्यक आहेत. निकाल लागून बराच काळ लोटलेला आहे. जेव्हा विद्यार्थी आणि त्यांचे पालक सेतु केंद्रावर प्रमाणपत्र काढण्यासाठी जातात तेव्हा हे प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाईनच होत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रमाणपत्र ऑनलाईन कधी होणार आणि विद्यार्थी, पालकांच्या हातात कधी पडणार, ऑनलाईन अॅडमिशन कधी होणार? असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थी, पालकांना पडले आहेत. याबाबीकडे जिल्हाधिकार्यांनी गांभीर्याने बघावे आणि महाऑनलाईनची सेवा तात्काळ सुरळीत करावी, अशी मागणी असंख्य पालक, विद्यार्थी वर्गातून होत आहे.