बीड (रिपोर्टर): परळी शहरातील गट 3 मधील भूमीहिन बेघर नागरीकांसाठी महाराष्ट्र राज्याच्या गृहनिर्माण खात्याअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनासाठी स्टेट लेवल सँन्शनिंग कमिटीकडून 15 हजार घरकुलांचे उद्दिष्ट नेण्यात येऊन या महत्वाकांंक्षी गृहनिर्माण प्रकल्पाला गती मिळावी यासाठी आज राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गृहनिर्माण व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांची भेट घेत सदरचा प्रस्ताव सादर केला. सावेंनी या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्तावास तात्काळ मंजुरी देण्याबाबत अधिकार्यांना सूचना केल्या.
परळी शहर हे सर्वाधिक घोषीत झोपडपट्टी असणारे शहर असून स्वत:च्या मालकीची जागा नसल्याने शहरातील अनेकांना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनेचा लाभ घेता येत नव्हता. शहरात भाड्याच्या घरात राहणार्या कुटुंबियांची संख्याही लक्षणीय असून बांधकाम कामगार, विविध उदद्योगातील रोजंदारी श्रमिक, शेतमजूर, असंघटीत कामगार यांना हक्काचं पक्कं घर गरजेचं असणे महत्वाचे आहे, असं म्हणत ना. धनंजय मुंडेंनी परळी शहरातील घटक 3 मधील भूमिहिन बेघर नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण खात्याअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जे 1500 घरकुलाचे उद्दिष्ठ देण्यात आले आहे या महत्वाकांक्षी भव्य गृहनिर्माण प्रकल्पाला गती मिळावी या उद्देशाने आज राज्याचे गृहनिर्माण व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन यावर चर्चा केली. सदरचे काम लवकर सुरू व्हावे, या प्रस्तावास मंजुरी मिळावी, असं म्हणत सर्वसामान्य बेघर लोकांसाठी घर उपलब्धतेबाबत भाष्य केले. त्यावर सावे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदरील प्रस्तावास तात्काळ मंजुरी देण्याबाबत अधिकार्यांना सूचना केल्या.