प्रेक्षकांमध्ये चेंगराचेंगरी, अनेक किरकोळ जखमी; शर्यतीला परवानगी होती का? नियोजनाचा अभाव असलेल्या संयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बीड (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यात प्रथमच बैलगाडीची शर्यत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत करण्यात आली होती. या शर्यतीला काल गालबोट लागले. नियोजनाचा शुन्य अभाव असल्यामुळे शर्यतीतली बैलगाडी थेट प्रेक्षकांमध्ये घुसल्याने यामध्ये अनेक प्रेक्षक चिरडले गेले. या दुर्घटनेत तीन ते चार विद्यार्थी जखमी झाले. या शर्यतीचे उद्घाटन खा. प्रितम मुंडे यांच्या हस्ते झाले होते. सदरील शर्यतीला पोलिसांची परवानगी होती का? बैलगाडी शर्यतीत दुर्घटना होणार नाही, याची व्यवस्था केली होती का? यासह अन्य प्रश्न उपस्थित होत आहेत. जिवावर बेतणार्या या शर्यतीत नियोजनाचा अभाव असल्यानेच ही दुर्घटना घडली. सुदैवाने यात जिवीत हानी झाली नाही. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात असून या प्रकरणात आयोजकांवर थेट गुन्हा दाखल करण्याची माणी केली जात आहे.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त काल दि. 1 जुलै रोजी तळेगाव परिसरामध्ये बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बीड जिल्ह्यात प्रथमच बैलगाडी शर्यत होत असल्याने ही शर्यत पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. शर्यतीसाठी परवानगी घेण्यात आली की नाही हे अद्याप समजू शकले नाही. या शर्यतीचे उद्गाटन खा. प्रितम मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रत्यक्षात जेव्हा शर्यत सुरू झाली तेव्हा त्या शर्यतीतल्या गाडीचे बैल अचानक उधळले अन् ते थेट प्रेक्षकांमध्ये घुसले. उधळलेल्या बैलामुळे अनेकजण बैलांच्या पायाखाली, गाडीच्या चाकाखाली आले. यामध्ये तीनपेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले आहेत. बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी मोठ्या उत्साहता आलेल्या प्रेक्षकांमध्ये उधळलेल्या बैलांसह गाडी घुसल्याने घटनास्थळी पळापळ झाली. त्या पळापळीमध्येही अनेकजण खाली पडले. त्यातही काही जण किरकोळ जखमी झाले. सदरची घटना अत्यंत गंभीर असून संयोजकांनी त्याठिकाणी सुरक्षेची कुठलीही व्यवस्था केली नसल्याचे प्रामुख्याने दिसून आले. प्रेक्षकांना बैल चिरडतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून नियोजनाचा अभाव असलेल्या या शर्यतीच्या संयोजकांवर आणि दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. सदरची घटना घडून चोवीस तास उलटल्यानंतरही बीड जिल्हा प्रशासनाने या गंभीर घटनेकडे लक्ष दिलेले नाही. शर्यतीला परवानगी आहे का? व्यवस्थापन व्यवस्थीत होतेत का? दस्तुरखुद्द खासदारांनी उद्घाटन केल्यामुळे या गंभीर घटनेकडे पोलीस दुर्लक्ष करतात का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून बैलांसह गाडीखाली चिरडलेल्या किरकोळ आणि गंभीर जखमींच्या उपचाराचीही व्यवस्था संयोजकांकडून करण्यात आली नसल्याने याबाबत संताप अधिकच वाढला आहे.