बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून): राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्यात सहाही विधानसभा मतदारसंघात लक्षवेधक लढती पहावयास मिळू लागल्या आहेत. गेवराईत तिरंगी फाईट त्यामध्ये मराठा कार्ड टाईटच्या भूमिकेत दिसून येत असून इकडे आष्टीत महायुतीतच विभागणी झाल्याने महाआघाडीच्या नवख्या उमेदवारावर धस-धोंडे-आजबेंपैकी कोण भारी पडतो याकडे लक्ष लागून आहे. माजलगावात विद्यमान आमदार प्रकाश सोळंकेंना शह देण्यासाठी आघाडीचे मोहन जगताप रिंगणात आले असले तरी रमेश आडसकरांच्या अपक्ष उमेदवारीने इथे तिरंगी लढत थेटपणे दिसून येत आहे. केजमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार नमिता मुंदडांविरोधात पृथ्वीराज साठे हे उभे आहेत आणि त्यांना आजी माजी आमदारांनी पाठींबा दर्शविल्याने तिथे विद्यमान आमदारात अस्वस्थता दिसून येत आहे. परळी निर्णायक मोडवर महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे हे स्पष्टपणे पहायला मिळत आहेत. तर बीडमध्ये जयदत्त क्षीरसागरांच्या उमेदवारी वापसीने इनसाईड स्टोरीवर चर्चा होत आहे.
बहुचर्चीत परळी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आपली विजयाची वाट मोकळी करण्यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्नाची पराकाष्टा केली आणि त्यांना यशही आले. अनेक नाराज त्यांच्या सोबत पत्रकार परिषद घेत आहे तर इथे महाआघाडीचे राजेसाहेब देशमुख यांना मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. धनंजय मुंडे हे प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून निर्णायक मोडवर पहायला मिळत आहेत. गेवराईमध्ये बदामराव पंडित, विजयसिंह पंडित हे महायुती आणि महाआघाडीचे उमेदवार असतानाच विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांच्यामुळे आणि तिसर्या आघाडीच्या पुजा मोरे यांच्यासह अन्य पक्षांच्या उमेदवारांमुळे इथे फाईट टाईट पहायला मिळू लागली आहे. माजलगावमध्ये महायुतीचे प्रकाश सोळंके तर महाआघाडीचे मोहन जगताप यांच्यात थेट लढत होईल, असे वाटत असतानाच रमेश आडसकरांच्या उमेदवारीसह मुंडे, निर्मळ या अपक्ष उमेदवारांमुळे ओबीसीतील मताचीं विभागणी महायुती आणि आघाडीच्या कुठल्या उमेदवाराला निर्णायक मोडवर नेते हे येत्या काही दिवसात समोर येईल. इकडे केज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे पृथ्वीराज साठे यांना संगीता ठोंबरेंसह अन्य उमेदवार आजी माजी आमदार यांनी थेट पाठिंबा दर्शविल्याने येथे विद्यमान आमदार नमिता मुंदडा अडचणीत सापडल्याचे दिसून येते. तिते सुरेश धसांनी केलेल्या मागणीनुसार आष्टीत धोंडे-धस-आजबे हे आपली ताकद पणाला लावत आहेत. ज्याचे नियोजन चांगले, ज्याचा संपर्क चांगला तो तिथे दांडगा होऊ शकतो तर बीडमध्ये महायुतीचे योगेश क्षीरसागर विरुद्ध महाविकास आघाडीचे संदीप क्षीरसागर यांच्यात तगडी फाईट होईल, असे वाटत असतानाच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांनी उमेदवारी काढून घेतली तेव्हा जयदत्त अण्णांच्या काफिल्यातले अनेक जण योगेश क्षीरसागरांचे समर्थन करताना दिसून येऊ लागल्याने विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर इथे अडचणीत येत आहे तर ज्योती मेटे, अनिल जगताप, कुंडलिक खांडे या तीन मराठा उमेदवारांमुळे मराठा मताचीं विभागणी त्यात या दोन क्षीरसागरांपैकी ध्रुवीकरणात कोण यशस्वी होतो या इनसाईड स्टोरीला अधिक महत्व प्राप्त होणार आहे.