संभाजीनगर/वडवणी (रिपोर्टर): संभाजीनगरच्या देवगिरी कॉलेजमध्ये बीसीएस चे शिक्षण घेण्यासाठी राहत असलेल्या एका 19 वर्षीय विद्यार्थ्याचा खून झाल्याची खळबळजनक माहिती समोर येत असून सदरचा विद्यार्थी हा वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील आहे. काल संक्रांतीच्या दिवशी तो राहत असलेल्या खोलीमध्ये त्याच्या सहकार्याला बेशुद्धावस्थेत मिळाला. तेव्हा त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्या. त्याला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील विश्वनाथ बद्रीनाथ निपटे यांचा 19 वर्षीय मुलगा प्रदीप विश्वनाथ निपटे हा शिक्षणासाठी संभाजीनगर येथील देवगिरी कॉलेजमध्ये बीसीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. तो उस्मानपुर भागात म्हाडा कॉलनीमध्ये त्याच्या नात्यातील दोन मुलांसोबत राहतो. काल रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास विश्वनाथ निपटे यांना त्यांच्याच भावाने भ्रमणध्वनीवरून पोरांचे भांडणे झाले आहेत आणि त्यामध्ये प्रदीप हा जखमी झाला आहे. त्यामुळे तुम्ही संभाजीनगरला या, असे सांगण्यात आले. त्यानुसार विश्वनाथ निपटे हे रात्री एक वाजण्याच्या सुमारास पिंपरखेड येथून संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात डेरेदाखल झाले. मात्र त्यावेळी दुर्दैवाने त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांच्या कानावर पडली. प्रदीप हा दिवसभर खोलीत होता, रात्री जेवणासाठी त्याच्या साथीदाराने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो उठत नसल्याचे पाहून त्याच्या अंगावरचे पांघरूण काढले तेव्हा प्रदीपच्या डाव्या हातावर, गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केलेले जखमा आणि छातीवर रक्त पहावयास मिळाले. तेव्हा तो बेशुद्धावस्थेत होता. याची माहिती उस्मानपूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. विश्वनाथ निपटे यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीपचा खून कोणी आणि कशासांठी केला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलीस तपास करत आहेत.