पुणे (रिपोर्टर): कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर शिलाई मशीनच्या कात्रीने मानेवर वार करत निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना पुणे शहरातील खराडी भागात घडली. पत्नीवर हल्ला होत होता तेव्हा तिने आरडाओरड केल्याने शेजारी त्यांच्या घराकडे धावले असता पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. उपस्थित शेजारच्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोलीस डेरेदाखल झाले. जखमी अवस्थेतील महिलेला रुग्णालयात दाखल केले मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता. हत्या केल्यानंतर संबंधित मारेकरी नवर्याने साडेतीन मिनिटांचा व्हिडिओ काढत ‘ही मला मारणार होती, मी स्वत:च्या रक्षणासाठी तिची हत्या केल्याचे सांगत मेहुण्यापासून अन्य दोन ते तीन लोकांचे नाव घेत त्यांच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याचे तो त्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. चंदननगर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपी हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून त्याचे नाव शिवदास तुकाराम गिते आहे तर मयत त्याच्या पत्नीचे नाव ज्योती शिवदास गिते असे आहे. या घटनेने पुणे शहरात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.

बीड जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेला शिवदास तुकाराम गिते व त्याची पत्नी ज्योती शिवदास गिते हे दोघे पुणे शहरातल्या खराडी भागात असलेल्या गल्ली क्र. 5 मधील तुळजाभवानी नगरमध्ये राहत आहे. तो येथील न्यायालयामध्ये लिपीक पदावर काम करत होता. ज्योती आणि शिवदास यांच्यात कौटुंबिक वाद होते. त्याचबरोबर तो ज्योती हिच्या चारित्र्यावर संशय घेण्याबरोबर ज्योती आपली मालमत्ता हाडप करेल, असेही त्याला सातत्याने वाटायचे. रात्री उशिरा शिवदास याने आपल्या मुलांसमोर ज्योतीच्या गळ्यावर शिलाई मशीनची कात्री खुपसली. एकाच वारात ज्योती खाली पडली. रक्तस्त्राव झाल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला असावा मात्र ज्या वेळेस या दोघांतील वाद सुरु झाला आणि शिवदासने हल्ला केला त्यावेळेस ज्योतीने आरडाओरड केल. त्यावेळेस शेजारच्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली.

ज्योती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्यांना दिसली. त्यांनी चंदननगर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी येण्यापूर्वी शिवदास याने तब्बल साडेतीन मिनिटांचा व्हिडिओ चित्रीत केला. हा व्हिडिओ चित्रीत करताना त्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या पत्नीकडे कॅमेरा ठेवत त्याच्यामध्ये तो बोलत आहे. त्याच्या व्हिडिओमधील बोलण्यामध्ये तू घरातली लक्ष्मी होतीस, पण तू मला फसवले यासह महुणा आणि अन्य दोन ते तीन लोकांचे नावे घेत यांच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याचे त्याने म्हटले आहे आणि हा व्हिडिओ त्याने त्याच्या कार्यालयीन एका ग्रुपवर टाकल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे चंदननगर पोलीस घयनास्थळी आले, त्यांनी रक्ताच्या थोराळ्यात पडलेल्या ज्योतीला रुग्णालयात दाखल केले मात्र तत्पूर्वी तिचा मृत्यू झाला होता. क्रोर्याची परिसीमा गाठणारी संतापजनक घटना घडल्याने पुणे शहर हादरून गेले आहे. इथेही बीडचा मारेकरी असल्याचे समोर आल्याने बीड जिल्ह्यातही या घटनेने खळबळ उडवून दिली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.










