केज-धारूर शहराच्या वाढीव-वस्तीत पाण्याचा ठणठणाट
नगर पालिकेचा निष्काळजीपणा नागरीकांच्या घशाला कोरड
मांजरा धरणात 31 टक्के पाण्याचा साठा
धारूर / केज, (रिपोर्टर)ः- मांजरा धरणातून केज, धारूर आणि बारा गावच्या गावकर्यांना पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या स्थितीत मांजरा धरणात बर्यापैकी पाणी साठा आहे. धरणात पाणी असूनही शहर वासियांना पाण्यासाठी वनवन भटकंती करण्याची वेळ आली. शहराच्या वाढीव वस्तीत नगर पालिकेने पाण्याची पाईपलाईन केली नसल्याने तेथील नागरिकांना विकत पाणी आणावे लागत आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थितीत केज वासियांनी झाली असून याला नगर पालिका प्रशासन जबाबदार आहे. जी परिस्थिती केज शहराची आहे तीच परिस्थिती धारूरची आहे.
बीड जिल्ह्यातील अनेक गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. बहुतांश विहिरीने तळ गाठला. पाणी पुरवठा करणारे बोअर सुध्दा अटलेले आहेत. जिल्ह्यातील जे काही निवडक मोठे तलाव आहेत. त्यामध्ये काही प्रमाणात पाण्याचा साठा शिल्लक राहिलेला आहे. केज तालुक्यातील मांजरा धरणातून केज, धारूर, आणि बारा गावच्या नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो. सदरील धरणातून पंधरा दिवसाला पाणी पुरवठा होत आहे. केज शहरात वाढीव वस्त्यांचा विस्तार झाला. त्या ठिकाणी नागरी सुविधा तर नाही, त्याचबरोबर पाण्याची सोय देखिल नगरपालिका प्रशासनाने केलेली नाही. वाढीव वस्त्यामध्ये धरणाच्या पाईपलाईनमधून पाणी पुरवठा करणे गरजेचे होते. मात्र नगर पालिकेने ते काम केले नाही. त्यामुळे तेथील नागरीकांना इतर ठिकाणावरून पाणी आणावे लागते. काही नागरिक स्वतच्या बोअरच्या पाण्याचा वापर करतात तर काहींना विकत पाणी घेण्याची वेळ येत आहे.
धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती केज वासियांनी झाली आहे. न.प.प्रशासनाचा अनागोंदी कारभार याला कारणीभुत आहे. न.प.ने वाढीव वस्त्यात तळ्याच्या पाईपलाईनवरून पाणी पुरवठा केला असता तर आज लोकांचे हाल झाले नसते.केज प्रमाणेच धारूर शहराच्या वाढीव वस्त्यांमध्ये पाणी नसते. तेथील नागरीकांना बोअरद्वारे किंवा टॅकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो. धनेगावच्या धरणातून जी पाईपलाईन केली आहे ती पाईपलाईन जिर्ण अवस्थेत आहे. नवीन पाईपलाईनचा प्रस्ताव नगर पालिकेने अद्याप तयार केलेला नाही किंवा त्यासाठी निधी देखिल उपलब्ध करण्यात आलेला नाही. धरणात पाणी असतांना देखिल केज आणि धारूरवासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याला शासन आणि प्रशासन जबाबदार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया होत आहेत.