
बीड (रिपोर्टर): बीड जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनानी, नारायणगड शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष, विवेकानंद शिक्षण संस्थेचे सदस्य अॅड. जगन्नाथराव औटे यांचे आज सकाळी दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 92 वर्षे होते.
जगन्नाथराव औटे हे गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा न्यायालयामध्ये वकीली करत होते. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. ते अॅड. बप्पा औटे व कृषी अधिकारी जयंत औटे यांचे वडील होते. अॅड. जगन्नाथराव औटे पाचंग्री यांचा पाचंग्री या छोट्याशा गावी जन्म झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण जातेगाव येथे झाले. विद्यार्थी दशेत त्यांनी स्वातंत्र्यपुर्व काळात भारत देश स्वातंत्र्य मिळविण्यासाठी योगदान दिले होते.
जिल्हा न्यायालयात 60 वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ त्यांनी वकिली केली. त्यांच्या सेवेमध्ये त्यांना महाराष्ट्र अॅण्ड गोवा बार काऊन्सिलने सन्मानित केले होते. वकील संघाच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. ते एक चालते-बोलते विद्यापीठ होते. अनेक वकिलांना त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थीवदेहावर सायंकाळी सात वाजता भगवानबाबा प्रतिष्ठाण जवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. औटे कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.