
माजलगावात आज बापानेच केला मुलाचा खून
माजलगाव (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे पार धिंडवडे निघू लागले. महिनाभरामध्ये जिल्ह्यात अनेक गंभीर स्वरुपाच्या घटना घडल्या. माजलगाव तालुक्यातील खानापूर येथे बापाने मुलाच्या डोक्यात बांबू मारून खून केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली. दारू पिण्याच्या कारणावरून बाप-लेकामध्ये कुरबूर झाली होती. यातूनच ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. बीड जिल्ह्यामध्ये अनाधिकृत दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. दारूमुळे गंभीर स्वरुपाच्या घटना घडू लागल्या आहेत. आजची खुनाची घटनाही दारूमुळेच घडली आहे. इतरही अनेक घटना दारूच्या कारणावरून घडत असल्याने अनाधिकृत दारू विकणार्यांविरोधात पोलीस प्रशासनाकडून कुठलीही कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे.
गोपाळ विठ्ठल कांबळे व रोहीत विठ्ठल कांबळे (रा. खानापूर ता. माजलगाव) या दोन्ही बाप-लेकाला दारूचे व्यसन होते. या दोघांनी आज सकाळी दारूच्या नशेमध्ये एकमेकांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. यातच गोपाळ विठ्ठल कांबळे याने आपला मुलगा रोहीत गोपाळ कांबळे याच्या डोक्यात बांबुने मारल्याने रोहीत जखमी होऊन मरण पावला. घटनेची माहिती शहर पोलिसांना झाल्यानंतर पोलिस निरीक्षक राहूल सुर्यतळ, पोलीस निरीक्षक आकाश माखणेंसह आदी कर्मचार्यांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेह माजलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. पोलिसांनी आरोपी पिता गोपाळ विठ्ठल कांबळे यास अटक केली आहे. या घटनेने माजलगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. एक महिन्यात माजलगाव तालुक्यात हा तिसरा खून आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात गंभीर स्वरुपाच्या घटना गडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बीड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात धाबे व इतर ठिकाणी दारूची सर्रासपणे विक्री होत आहे. या दारू विक्रेत्यांना पोलीस प्रशासनाकडून अभय मिळते. दारूमुळे गंभीर स्वरुपाच्या घटना घडू लागल्या आहेत. व्यसनाधिन झालेले लोक टोकाची भूमिका घेत एकमेकांना जिवे मारू लागले आहेत.
दारूच्या कारणावरून चार खून झाले
बीड जिल्ह्यामध्ये कुठेही सहजपणे दारू मिळत आहे. दारूमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागलाय. नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ लागला. गेल्या एक महिन्याच्या कार्यकाळात दारूच्या कारणावरून चार खुनाच्या घटना घडल्या. परळी तालुक्यात चुलतीला पुतण्याने ठार केले, अंबाजोगाईतील येल्डा येथे मुलाने आईचा खून केला. माजलगाव तालुक्यातील बाबासाहेब आगे यांचा खून तसेच महादेव गायकवाड यांचा देखील खून दारूच्या कारणावरूनच झालेला आहे.





