तपासणीसाठी आयुक्तांनी पथक पाठवले
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींअंतर्गत रोहयो योजनेची कामे केली जातात. यामध्ये काही ठिकाणी बोगसगिरी हाते आहे. बीड तालुक्यातील नाळवंडीसह आठ गावांतील कामात भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणाची चौकशी रोहयोच्या नागपूर आयुक्तालयाकडे करण्यात आली होती. आयुक्तांनी तक्रारीची दखल घेत कामांची तपासणीसाठी पथक पाठवले आहे. हे पथक आज दाखल झाले आहे. कामांची पाहणी करणार आहे.
नाळवंडी, घोडका राजुरी, म्हाळसजवळा, रुद्रापूर, हिवरापहाडी, अव्वलपूर, पोखरी मैंदा, बोरफळी या आठ गावांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे झालेले आहेत. या कामात बोगसपणा आणि अनियमितता असल्याची तक्रार नागपूर आयुक्तालयाकडे करण्यात आली होती. आयुक्तांनी तक्रारीची दखल घेत कामाच्या चौकशीसाठी पथक पाठविले आहे. हे पथक आज बीड येथे दाखल झाले असून कामाची चौकशी करणार आहेत. हजेरी पत्रके, रजिस्टर कामाची नोंदवही, मोजमाप पुस्तिका, कुशल देयके, जिओ टॅगिंगचे फोटो, सिमेंट रस्ता, पेवर ब्लॉक, कामाची गुणवत्ता यासह अन्य बाबींची पथकाचे कर्मचारी पाहणी करणार आहेत. कामाची पाहणी करण्यासाठी पथक येताच संबंधितांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. पथकामध्ये गणेश आदमनकर, श्रीमती वैशाली कुलकर्णी, उद्धव होळकर, जितेंद्र चौधरी या कर्मचार्यांचा समावेश आहे.





