बीड (रिपोर्टर) राज्यात सर्वत्र गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात बीड जिल्ह्यातील 120 शिक्षकांनी बोगस टीईटी हस्तगत करून विविध अनुदानित खासगी संस्थेत नोकरी मिळवली. याबाबत बीड जिल्हा परिषदेने 120 बोगस टीईटी प्रमाणपत्रे हस्तगत केल्याची यादी शिक्षण विभागाला पाठविली असता याबाबत अधिकृत आदेशानंतर या शिक्षकांची संस्थेतली सेवा कार्यमुक्त करून त्यांच्याकडून उचलण्यात आलेला पगार वसूल करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.
राज्यात सर्वत्र बोगस टीईटी शिक्षक घोटाळा गाजत आहे. बीड जिल्ह्यातील 120 शिक्षकांनी बोगस टीईटी प्रमाणपत्र हस्तगत करून विविध खासगी अनुदानित संस्थेत नोकरी मिळवली आहे. या 120 पैकी जिल्हा परिषदेचे एकही शिक्षक नाही. मात्र आंतर जिल्हा बदलीने बीड जिल्हा परिषदेला एखादा बोगस टीईटी प्रमाणपत्र धारण केलेला शिक्षक आहे की कसे? हेही तपासण्यात येत आहे. या बोगस शिक्षकांची किती वर्षे सेवा झालेली आहे, त्यांनी किती पगार उचललेला आहे याबाबत तपासणी करणे चालू आहे. शासनाचे आदेश यांच्याबाबतीत अद्यापपर्यंत जिल्हा परिषदेला प्राप्त झालेले नाहीत. मात्र येत्या एक-दोन दिवसात हे आदेश प्राप्त होतील. त्यानंतर ज्या संस्थेत हे शिक्षक आहेत त्या संस्था चालकाला पत्र देऊन या शिक्षकांची सेवा कार्यमुक्त करण्यात येणार आहे. सोबतच सेवा कालावधीमध्ये यांनी उचललेला पगार वसुलही करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.