Wednesday, January 27, 2021
No menu items!
Home क्राईम कौटुंबिक वादात हस्तक्षेप केला महारुद्रने राजाभाऊचा खून केला

कौटुंबिक वादात हस्तक्षेप केला महारुद्रने राजाभाऊचा खून केला


पूर्वीपासूनच मनुष्यप्राणी हा समूहाने रहात आलेला आहे. शहरी भागातील जिवनमान बदलले असले तरी आजही ग्रामीण भागात एकमेकांच्या अडी अडचणीला धावून जाण्याची पद्धत कायम आहे. एकमेकांच्या सुख दुःखाला माणूस नेहमीच धावून गेलेला दिसतो. अनेक वेळा घरातील भांडणे हे घरातच मिटवली जातात. मात्र केव्हा केव्हा लोकांच्या भांडणात अडीअडचणीत धावून जाने हे अनेकांच्या जिवावर बेतल्याच्या धक्कादायक घटनाही समोर आलेल्या आहेत. एखाद्या मित्रासोबत अथवा परक्यासोबत जर एखाद्याचे भांडण झाले तर तो मित्रांचा आधार घेवून समोरील व्यक्तिशी दोन हात करतो. मात्र ते मित्र असो वा नातेवाईक जर त्यांनी आपल्या कौटुंबिक भांडणात दखल दिली तर ते अनेकांना खटकतं अन् त्यातून नको ते घडतं. अशीच एक घटना बीड शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंथरवण पिंपरी फाट्यावर घडली. कौटुंबिक वादात हस्तक्षेप केला म्हणून सुडाने पेटलेल्या महारुद्रने राजाभाऊवर सपासप धारदार शस्त्राने वार करुन निर्घुन खून केल्याची धक्कादायक घटना ५ नोव्हेंबर २०२० रोजी घडली. खून करुन फरार झालेल्या आरोपीच्या पोलिसांना मोठ्या शिताफिने मुसक्या आवळून त्याला जेरबंद केले.

Crime Logo copy


ज्याला क्रोधावर नियंत्रण ठेवता येते तो जग जिंकू शकतो. मात्र घाईघाईत घेतलेला प्रत्येक निर्णय संकटात नेणारा असतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यावर चार वेळा विचार केलेलं बर असतं. विचार न करता घेतलेला निर्णय चुकल्यानंतर पुन्हा त्यावर विचार करून अन् पश्चाताप करून काहीच उपयोग होत नाही. महारुद्रने नेमक तेचं केलं. ‘आमच्या कौटुंबिक भांडणात राजाभाऊचं काय काम?, ‘आम्ही आमचं बघून घेऊ’, ‘तो माझ्या घरी आलाच कसा’ असे म्हणून त्याचा काटाच काढायचा ठरवल्याने दि. ५ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री ८.१५ मिनिटाने महारुद्र उमरी फाट्याजवळील समर्थ जेन्ट्स पार्लरचा चालक रविंद्र गोविंद भंडारे (वय २२ वर्षे) याच्या गळ्याला चाकू लावून तू आत्ताचे आत्ता राजाभाऊ खराडेला येथे बोलावून घे म्हणाल्याने नाईलाजाने रवींद्र भंडारे ने राजाभाऊ खराडे याला फोन करुन उमरी फाट्याजवळ बोलावून घेतले. राजाभाऊ त्याची दुचाकी घेवून फाट्यावर आल्याबरोबर महारुद्रने त्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याच मोटरसायकलवर बसून त्याला बीडच्या दिशेने घेऊन गेला. चाकुचा धाक दाखवल्याने घामाघूम झालेला रवींद्र भंडारे हा तसाच धावत पळत राजाभाऊ खराडे यांच्या घरी गेला अन् राजाभाऊच्या आई, पत्नी आणि मुलांसमोर राजाभाऊला कोणी कुठे आणि का? नेले हे सांगितले. लगेच राजाभाऊची आई मुद्रिका अशोक खराडे, दत्ता व भाचा परमेश्वर टेकाळे आणि रवींद्र भंडारे हे उमरी फाट्यावर आले आणि राजाभाऊचा शोध घेऊ लागले. तेथे तो न मिळाल्यामुळे ते पुढे पेट्रोल पंपापर्यंत त्याचा शोध घेत चालत गेले. राजाभाऊ चा शोध घेऊ लागले मात्र त्यांना राजाभाऊ व महारुद्र मिळून आले नाही. त्यानंतर परमेश्वर टेकाळे याने राजाभाऊला कॉल केला. त्यावेळी राजाभाऊने फोन उचलला असता त्यालाा टेकाळेने विचारले ‘तू कोठे आहेत व कुठे चालला’ तेव्हा राजाभाऊ म्हणाला ‘मी बीडमध्ये आहे’. पुन्हा लगेच म्हणाला ’मी पिंपरी फाट्यावर आहे. थोडा अडचणीत आहे’ असे सांगून राजाभाऊने फोन कट केला त्यानंतर सर्वजण पिंपरी फाट्यावर आले तिथेही राजाभाऊ मिळून न आल्याने त्यांनी बीड बायपास, एमआयडीसी परिसरासह इतरत्र महारुद्र आणि राजाभाऊचा शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाहीत त्यामुळे राजाभाऊची आई मुद्रिका अशोक खराडे (वय ४० वर्षे रा. नागापूर बुद्रुक ता.जि. बीड) यांनी पिंपळनेर पोलिस ठाणे गाटत आपला मुलगा राजाभाऊ याला महारुद्र मच्छिंद्र परस्कर (वय २५ वर्षे,रा.उंबरी ता. जि. बीड) याने अपहरण करून पळून नेल्याची फिर्याद दिली. यांच्या फिर्यादीवरून महारुद्र मच्छिंद्र परस्कर याच्याविरुद्ध पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी गुन्हा रजिस्टर नं. ३११/२० कलम ३६५ भा.द.वि. गुन्हा दाखल करून घेतला. रात्री सर्वत्र राजाभाऊचा शोध घेत होते मात्र तो मिळून आला नसल्याने शेवटी अडीच वाजता हा गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतरही नातेवाईक आणि पोलीस कर्मचारी रात्रभर राजाभाऊच्या शोधात होते मात्र तो सापडला नाही. सकाळी पोलीस आणि नातेवाईक राजाभाऊ आणि महारुद्र यांचा शोध घेत असतांनाच दहा वाजता नातेवाईकांना माहिती मिळाली की राजाभाऊचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पिंप्री फाट्यावरील रस्त्याच्या कडेला एका शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती मिळाली. आणि एकच खळबळ उडाली. राजाभाऊचे नातेवाईक आणि पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव सानप, बाळासाहेब सुरवसे, शरीफ शेख, अजय जाधव, छत्रभुज दापकर, दिनकर कानडे यांच्यासह आदी पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. राजाभाऊचे अपहरण हे महारुद्रा परसकर यानेे केल्याचे माहित असल्याने पोलिसांनी त्याच दिवशी म्हणजेच दिनांक ६.११.२०२० रोजी गुन्ह्यात कलम ३०२ वाढवला. आणि या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव सानप त्यांच्याकडे दिला. खून कोणाचा झाला, आरोपी कोण आहे हे चित्र पोलिसांसमोर स्पष्ट झालेले होते. त्यामुळे आता पोलिसांना आरोपी अटक करणे गरजेचे होते. त्यामुळे पिंपळनेर पोलिस ठाण्याचे ठाणे प्रमुख सपोनि शरद भुतेकर यांनी पोलीस अधिक्षक राजा रामास्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांचे मार्गदर्शन घेऊन आरोपीला पकडण्यासाठी काही पथके तयार केली आणि आरोपीच्या मागावर पाठवले. आरोपी महारुद्र परसकरने राजाभाऊचा धारदार शस्त्राने खून करून त्याचीच दुचाकी क्र. (एम.एच. २३ बी.ए. १२२०) घेऊन फरार झाला होता. पिंपळनेर पोलिस ठाण्यातील बाळासाहेब सुरवसे, हनुमंत पिंगळे, तुकाराम चांदणे, अजय जाधव, दिनकर कानाडे हे आरोपीच्या मागावर गेले होते. आरोपी हा त्याच्या मित्राला फोन वरून बोलत होता त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मित्राला सोबत घेतले होते. आणि मित्राचा मोबाईल सायबर सेलचे विकी सुरवसे यांच्याकडे दिला होता. त्यावरुन पोलिस आरोपीचा मागावा काढत होते. गेवराई- औरंगाबाद- मालेगाव- धुळे त्यानंतर नाशिक- संगमनेर- आळेफाटा येथे शोध घेतला मात्र आरोपी त्यांना मिळून आला नाही. त्यानंतर पोलिस पथक नगरला दाखल झाले. तेथे त्यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बस स्थानकात बसलेला आरोपी महारुद्रला ८ नोव्हेंबर २०२० रोजी ताब्यात घेतले त्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.

पोलिसांनी आरोपी महारुद्रची चौकशी सुरू केल्यानंतर क्षुल्लक कारणावरून राजाभाऊचा खून केल्याचे समोर आले. राजाभाऊच्या आईची मावस बहीण रविंंद्र परसकर (रा. उमरी, ता.जि. बीड) याला दिलेली आहे . मात्र त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून कौटुंबिक वाद होत होते रविंद्र परसकर याची बायको उमरी येथे नांदत असताना तिला त्रास देऊ नका म्हणून समजावून सांगण्यासाठी रविंद्र परसकरचा मेहुना संजय कुटे याने राजाभाऊ खराडे यांना सोबत घेऊन आपल्या बहिणीला व्यवस्थित नांदवा तिला त्रास देऊ नका म्हणून उमरी येथे गेला होता. त्यावेळी आरोपी महारुद्र हा घरी नव्हता तो बीड येथे कामाला असल्याने तेथेच राहत होत. संजय कुटेने आपला मेहुणा रविंद्र आणि त्यांच्या आई-वडिलांना समजावून सांगितले मात्र त्यांनी तुमची पोरगी आम्हाला नको तिला घेऊन जा असे म्हणल्यामुळे संजय आपल्या बहिणीला घेऊन गेला. त्यानंतर आरोपी महारुद्र मच्छिंद्र परसकर गावी आल्यानंतर आई-वडिलांनी त्याला आपल्या घरी राजाभाऊ खराडे आला होता असे सांगितले. आपल्या कौटुंबिक भांडणात राजाभाऊचं काय काम? तो कशासाठी आला होता? असे म्हणून आता राजाभाऊलाच बघतो या क्षुल्लक कारणावरून त्याने राजाभाऊचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले. दि.१० नोव्हेंबर २०२० रोजी आरोपीला पोलिसांनी घटनास्थळी नेवून गुन्ह्यात वापरलेला धारदार चाकू आणि मोबाईल आरोपीने जिथे लपून ठेवला होता तेथून काढून पोलिसांना दिला. पोलिसांनी त्याचा पंचनामा करून तो जप्त केला. त्यानंतर आरोपीने राजाभाऊची मोटर सायकल अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार बस स्टॅन्डवर सोडली होती. तीही पोलिसांनी हस्तगत केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलिस करत आहेत.

Most Popular

ड्रग्ज आऊट ऑफ कंट्रोल शहरात एकाचा बळी

ग्राऊंड रिपोटींग- शेख रिजवान कोडिन व कॉस्मेटीक पदार्थाचा जास्त...

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक आर. राजा यांचा सन्मान

*जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विभागीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थी , पोलीस दलातील...