बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र शोकसागरात बुडाला, मुंबई एक्सप्रेस हायवेवर
झाला अपघात, एक तासापर्यंत मेटेंना मदतच मिळाली नाही, आज सायंकाळी
पार्थिवदेह बीडमध्ये, उद्या दुपारी विनायक मेटेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
मुंबई/बीड (रिपोर्टर) गेल्या चार दशकापासून मराठा समाजाचा आवाज बुलंद करत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पोटतिडकीने रस्त्यावर आणि विधानभवनात आवाज उठवणारे शिवसंग्रमाचे सर्वासर्वे माजी आ.विनायक मेटे यांचे अकाली अपघाती दुर्देवी निधन झाले. रात्री ते आपल्या मोटारीतून मराठा आरक्षणासंदर्भाच्या महत्वपूर्ण बैठकीसाठी मुंबईला निघाले होते. पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्यांच्या गाडीला भिषण अपघात झाला. अपघातानंतर एक तास मेटेंना कुठलीही मदत मिळाली नाही. दुर्देवाने मराठ्यांचा आवाज काळाच्या पडद्याआड गेला. मेटेंच्या निधनाच्या बातमीने बीड जिल्ह्यासह अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडून गेला. सायंकाळी उशिरा मेटेंचे पार्थिव मुंबईवरून बीडमध्ये आणण्यात येणार आहे. सायंकाळी अंत्यदर्शनासाठी शिवसंग्राम भवनात पार्थिव ठेवण्यात येणार असून उद्या दुपारी 3.30 वा. त्यांच्या पार्थिवदेहावर बीड शहरातील कॅनॉल रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपजवळ असलेल्या त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आज शहरामध्ये अमृत महोत्सवानिमित्त आयोजीत शासकीय, प्रशासकीय आणि पक्षसंघटनीय पातळीवरील सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
इ.स.1985-86 पासून मराठा महासंघाच्या माध्यमातून समाजासाठी चळवळीत आलेले विनायक मेटे हे मराठा समाजाचा बुलंद आवाज बनले होते. गेल्या चाळीस वर्षाच्या कालखंडात विनायक मेटेंनी मराठा समाजासाठी रस्त्यावर अनेक आंदोलने केली. समाजासाठीच नव्हे तर कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर यांचे प्रश्न घेवूनही ते सातत्याने रस्त्यावर उतरले. गेल्या चार दशकाचा संघर्षमय आणि चळवळीचा कार्यकाळ पाहता मेटे हे मराठा समाजाबरोबर बहुजनांचे नेतृत्व करत होते. शिवसंग्राम संघटनेची स्थापना केल्यानंतर ते अधिक आक्रमक झाले. आजपावेत त्यांनी पाच वेळेस विधानपरिषदेवर आमदार म्हणून काम केले. आज शिवसंग्रामच्यावतीने अमृतमहोत्सवानिमित्त शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे ते गेले दोन दिवस बीडमध्ये तळ ठोकून होते. रात्री उशिरा मराठा समाजाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक असल्याकारणाने 11 च्या दरम्यान ते मुंबईसाठी रवाना झाले. मुंबई एक्सप्रेस हायवेवरून त्यांची गाडी जात असताना दहा टायर मोठ्या ट्रकने त्यांच्या गाडीला कट मारला. यात मोठा अपघात झाला. अपघात घडल्यानंतर तब्बल एक तास मेटे यांच्या गाडीचा चालक मदतीसाठी याचना करत होता. मात्र तिथे कुठलीही मदत पोहोचली नाही. नंतर मेटे यांना सकाळी 6-6.30 वाजण्याच्या सुमारास एमजीएम रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी रूग्णालयात येण्यापूर्वी मेटेंचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे घोषीत केले. मेटेंसोबत असलेले बॉर्डिगार्ड हे ही या अपघातात गंभीर जखमी असून चालक एकनाथ कदम हे किरकोळ जखमी आहेत. विनायक मेटे यांच्या मृत्यूची बातमी जशीच माध्यमांमधून महाराष्ट्रभर पसरली तसा त्यांच्या मृत्यूच्या बातमीने अनेकांना धक्का बसला. बीड जिल्ह्याच नव्हे तर अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. मेटे हे गेल्या चाळीस वर्षाच्या कालखंडात सर्वसामान्य कुटूंबातून चळवळ करत संघर्ष करत मोठे झालेले नेते होते. मेटेंचा पिंड हा सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवणारा होता. मेटेंच्या निधनाने बीड जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले. आज सायंकाळी मेटेंचा पार्थिवदेह मुंबईवरून बीड येथे आणण्यात येणार असून सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अंत्यदर्शनासाठी पार्थिवदेह शिवसंग्राम भवन येथे ठेवण्यात येणार आहे. उद्या 3.30 वाजता त्यांच्या पार्थिवदेहावर बीड शहरातील कॅनॉल रोडवर असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपनजीकच्या त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
मेटेंच्या अपघाताची चौकशी
होणार; मुख्यमंत्र्यांचे आदेश
शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचा आज पहाटे अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या परिवाराची भेट घेत सांत्वन केलं. या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
सामाजिक प्रश्नांसाठी तीव्र भूमिका
विनायक मेटे अनेक वर्षे महाराष्ट्र विशेषत: मराठवाड्याच्या सामाजिक जिवनात सक्रीय होते. या क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. सामाजिक प्रश्नांसाठी त्यांच्या भूमिका तीव्र होत्या. आपल्या मागण्यांसाठी ते अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडती करत होते. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी मेटेंच्या निधनाचे वृत्त कळाले. त्यामुळे धक्काच बसला. महाराष्ट्राच्या सामाजिक जिवनात मेटेंनी मोलाची कामगिरी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विनायक मेटे यांचे कुटुंबीय व सहकार्यांच्या दु:खात सहभागी आहे.
– शरद पवार,
अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
ड्रायव्हला डुलकी लागली
असेल-अजित पवार
विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाल्यावर आपला अजूनही विश्वास बसत नसल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार म्हणाले, आजची पहाट ही काळी पहाट आहे. पहाटे-पहाटे हा अपघात झाल्याचे समजले. विनायक मेटे यांच्या वाहनचालकाला कदाचित डुलकी लागली असेल. त्यामुळेच अपघात झाला असेल. शक्यतो राजकारण्यांनी रात्रीचा प्रवास करणे टाळावे. मात्र, अनेकदा वेळ फार महत्त्वाची असते. त्यामुळे प्रवास टाळता येत नाही. मात्र, खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले.