नवी दिल्ली (वृत्तसेवा): नववर्षाच्या सुरूवातीलाच केंद्र सरकारनं देशवासियांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. देशात हळूहळ करोना लसींना मान्यता दिली जात असताना ती निशुल्क असणार की पैसे मोजावे लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्याचं उत्तर अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिलं आहे. देशभरात ड्राय रन सुरू असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.
सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. इतरही लसी परवानगीच्या प्रतिक्षेत असून, केंद्र सरकारने लसीकरणासाठीची पूर्वतयारीही सुरू केली आहे. देशभरात ड्राय रन केलं जात आहे. याच दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी करोना लसीसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली.
प्रत्येक राज्यात ठराविक शहरांमध्ये ड्राय रन केलं जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयाचा दौरा करून ड्राय रनचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. करोना लसीसाठी नागरिकांना पैसे द्यावे लागतील की, दिल्लीप्रमाणे मोफत दिली जाणार आहे? असा प्रश्न हर्ष वर्धन यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले,फक्त दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोना लस मोफत दिली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.