
डॉ. संपदा मुंडेंची आत्महत्या महाराष्ट्रातल्या शासन-प्रशासन व्यवस्थेचा नागडेपणा सांगणारी म्हणावी लागेल. कष्टकर्याची, शेतकर्याची पोर मोठ्या मेहनतीने शिक्षण घेते, उच्च पदावर जाते मात्र काम करताना तिला व्यवस्था ज्या पद्धतीने वागवते, तिची ज्या पद्धतीने अवहेलना करते आणि सरशेवटी तिला मृत्युच्या दारात घेऊन जाते हे संतापजनक. बलात्कार करणारा कोण? तर खाकी वर्दीतला पोलीस उपनिरीक्षक नराधम. आपलं इमान राखत कर्तव्य बजावत असताना संपदाला खोटं काम करण्याबाबत आदेशीत करणारा कोण? तर एक माजी खासदार? त्याचा पीए? म्हणजे संपदाला कोणी गुंड-पुंडांनी त्रास दिला नाही, कुठल्या बेवड्याने त्रास दिला नही, तिला त्रास दिला तो शासन आणि प्रशासन व्यवस्थेतील भ्रष्टाचाराने बरबटलेल्या नितीमत्ता सोडलेल्या हरामखोरांनी. होय, इथे आम्ही हरामखोर हा शब्दप्रयोग अत्यंत जाणीवपुर्वक करतो. ज्यांना इमान नाही, ज्यांचे इमान लाचखोरी आहे, ज्यांना वाटतं की, सत्ता ही आमची बटीक आहे, ज्यांना वाटतं आम्ही कायद्याचे रक्षक नव्हे तर मालक होऊन भक्षक होऊ. अशांना हरामखोर म्हणणार नाही तर आणखी काय त्या
शेतकरी बापाला
मुलीच्या आत्महत्येनंतर काय वाटत असेल. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कोठरबन सारख्या एका छोट्याश्या खेडेगावात संपदाचा शेतकरी बाप घामाचे रक्त ओकत काम करतो, कधी ऊसतोडणीला जातो, लहानपणापासून आपल्या लेकीला त्याने तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले असेल, तिचे कौडकौतुक केले असेल, तिच्यावर उन आले असेल तर बाप सावली होऊन उभा राहिला असेल. जेव्हा तिचं उच्च शिक्षण सुरु झालं तेव्हा आभाळाएवढा खर्च झेपावताना त्या बापाने आपल्या आयुष्याची जमापुंजी खर्च केली असेल, स्वत: कर्जबाजारी झाला असेल आणि पोरीला उच्चशिक्षण दिले असेल. त्याच शेतकरी बापाची संपदा ही मुलगी नव्हती तर स्वप्नपूर्ती होती. रात्री जेव्हा तिचा मृतदेह बापाजवळ आला असेल तेव्हा त्या बापाचे हृदय काय म्हणत असेल, तिचा तो निस्तेज चेहरा पाहून बापाला आणि खासकरून तिच्या आईच्या संवेदना त्या काय असतील. संपदाला जेव्हा स्मशानात नेलं गेलं असेल, तिला सरणावर ठेवलं असेल त्या वेळेस तिच्या बापाच्या भावना काय असतील. बोटाला धरून चालण्यापासून ते स्टेथेस्कोप गळ्यात लटकवण्यापर्यंत सर्वकाही बापाच्या डोळ्यांसमोर धावत असेल. संपदाचा मृतदेह जेव्हा सरणावर ठेवला, सरणाला आग लावली तेव्हा संपदाचा शरीर नव्हे त्या शेतकरी बाापाचा शरीर जळत होतं. यातून आम्हाला स्पष्टपणे एवढच दिसलं ते म्हणजे
व्यवस्थेचा भेसूर चेहरा
फलटणच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये कर्तव्य बजावत असताना संपदावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार झाले. जे संरक्षण देण्याचं काम करत होते तेच शिकारी बनले. पोलिसांच्या गणवेशात लपलेला नराधम गोपाळ बदने नावाचा राक्षस याने संपदाला आत्महत्या करेपर्यंत ढकलून दिले. ही लाज आहे, ही व्यवस्था कुजलेली आहे. शासन – प्रशासन व्यवस्तेतील त्या हरामखोरांचा हा माज आहे. जेव्हा संपदाने आपल्या हातावर आरोपींची नावे लिहीली तेव्हा ती फक्त आत्महत्या करत नव्हती, ती समाजाच्या मनावर एक प्रश्न अक्षरश: जाळत होती. महिलांसाठी ही व्यवस्था आहे की, नराधमांसाठी ? हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला ती विचारत होती. हे प्रकरण एवढं गंभीर, प्रशासनातील खाकी इथे बदनाम झाली तशी खादीही बदनाम झाली. भाजपाच्या माजी खासदाराचं या प्रकरणाशी नाव जोडलं जातय. गुन्हेगाराची फिट-अनफिट सर्टिफिकेट देण्यावरून सत्तेच्या जोशात असलेल्या मदमस्त खादीवाल्याने संपदाला डिवचल्याचं सांगितलं जातय. हे जर खरं असेल तर या महाराष्ट्राची प्रमुख व्यवस्था कुठल्या दिशेने जातेय? याची चौकशी झाली पाहिजे. व्यवस्थेतील खाकी आणि खादी स्वच्छ करायची असेल तर दोषी लुच्च्यांना कारागृहापर्यंत न्यावे लागेल. म्हणूनच आम्ही म्हणू,
आता पुरे झाले,
बीड उठेल महाराष्ट्र बोलेल
ही आग सरणाची नाही, आक्रोशाची आहे. ही ज्वाला प्रत्येक त्या अधिकार्याला भस्म करण्याची ताकद ठेवणारी आहे. या प्रकरणात ज्यांनी ढिलाई दाखवली, संपदाच्या मृत्युला आत्महत्या म्हणणं म्हणजे सत्य दफन करण्यासारखं आहे. म्हणून आम्ही इथं ठामपणे म्हणू, ती आत्महत्या नव्हती, ती व्यवस्थेने केलेली हत्या होती. ती हत्या त्या व्यवस्थेचीही होती. जी मुलींना सुरक्षित ठेवू शकत नाही, जी व्यवस्था भ्रष्टाचारात बुडून गेली आहे, जी राजकीय दबावाखाली नमते घेते, ती व्यवस्था नाही तर एक वेश्या आहे. होय, हा आमचा नव्हे उभ्या महाराष्ट्राचा संताप आहे. काल-परवा डॉक्टर झालेल्या तरुणीला आपलं जीवन असं संपवावं लागतं आणि हे संपवताना तिच्या कानात जेव्हा बीडवरून हिणवलं जातं तेव्हा या महाराष्ट्रातल्या व्यवस्तेबद्दल आणि पुढार्यांच्या मानसिकतेबद्दल इथं बोलावच लागेल, म्हणून आम्ही म्हणतो, आता पुरे झाले, बीडतर उठेलच उठेल हा महाराष्ट्रही बोलेल. आज वडवणी तालुक्यातून, बीड जिल्ह्यातून प्रत्येक संवेदनशील माणूस म्हणतो, संपदाला न्याय द्या, जे दोषी आहेत त्यांना फाशी द्या, जे झाकपाक करतात, त्यांना खुर्चीवरून फेकून द्या, कारण ही फक्त संपदाची नाही, प्रत्येक मेहनती, कर्तबगार, स्वप्नाळू मुलीची कहानी आहे. संपदाच्या सरणातून निघालेली आग आज प्रशासनाच्या अंत:करणात शिरावी, त्यांचा आत्मा जळावा. तेव्हाच तिचे बलिदान सार्थ ठरेल. होय, संपदा जिवंत आहे, तिच्या ज्वाळांमध्ये, तिच्या प्रश्नांमध्ये आणि आता जनतेच्या क्रांतीमध्येही ती दिसेल.







