गणेश सावंत
बीड जिल्हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे, हे नवीन नाही. मात्र सध्या या संवेदनशीलतेचा थेट फायदा प्रशासनिक यंत्रणा घेत असल्याचे चित्र अधिक ठळकपणे समोर येत आहे. जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी म्हणजे भ्रष्ट, निष्क्रिय आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे; आणि प्रशासन म्हणजे एकमेव प्रामाणिक, कार्यक्षम, विकासाभिमुख यंत्रणा-असा एकतर्फी नैरेटिव्ह जाणीवपूर्वक उभा केला जातोय का? असा प्रश्न आता उघडपणे उपस्थित होतोय.
बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बीड माझ्या विशेष लक्षात आहे असं वारंवार जाहीरपणे सांगितलं आहे. केवळ बोलून नाही, तर गेल्या सहा-सात महिन्यांत पाच ते सहा वेळा बीड जिल्ह्याचा दौरा करून, दोन वेळा मुक्कामही करून त्यांनी ते सिद्ध केलं. या काळात त्यांनी अधिकारी, गुत्तेदार आणि कार्यकर्त्यांना कोणताही आडपडदा न ठेवता ठणकावून सांगितलं-काम दर्जेदार करा, कामासाठी माझ्याकडे येऊ नका. मग प्रश्न असा पडतो की, इतक्या स्पष्ट सूचनांनंतरही बीडची प्रतिमा भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि नकारार्थी दृष्टिकोन अशीच का रंगवली जाते? आणि या प्रतिमेचा सर्वाधिक फायदा कुणाला होतो?
अजितदादा बीडमध्ये आले की शहर स्वच्छ होतं. रस्ते चमकतात. फाइल्स हलतात. अधिकारी दालनात बसलेले दिसतात. कर्मचारी तत्पर असतात. आणि दादा गेले की पुन्हा बीड जैसे थे! हे काय प्रशासनिक कार्यक्षमतेचं लक्षण आहे का? की केवळ वरिष्ठ नेत्यांसमोर दिखाऊ शिस्त पाळण्याची सवय? जर अजितदादा आल्यावर बीड स्वच्छ, शिस्तबद्ध आणि कार्यक्षम होऊ शकतं, तर तेच बीड दादा नसताना स्वच्छ आणि कार्यक्षम का राहत नाही? प्रशासनाची जबाबदारी ही दौर्यापुरती असते का? दोन-तीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलेल्या वृक्षारोपण मोहिमेचं उदाहरणही बोलकं आहे. 30 लाख नव्हे, 3 हजार झाडं जरी जगली असतील तर आम्ही त्यांची पाठ थोपटू असे आम्ही छातीठोकपणे सांगू. 30 लाख झाडांवर किती खर्च झाला ? दादांनी जे झाडे लावले ते तरी जगायला हवे होते. त्यांनीही प्राण सोडला. मग प्रशासकीय वरिष्ठ अधिकार्यांचा हा उठाठेवपणा नेमका कशासाठी? असे एकीकडे वाटत असले तरी दुसरीकडे मात्र हा प्रश्न घोषणांचा नाही, प्रश्न परिणामांचा आहे. झाडं लावली की काम झालं, की ती जगवणं हेही प्रशासनाचंच कर्तव्य असतं? आज अजित पवारांचा दौरा तीन वेळा रद्द झाल्यानंतर चौथ्यांदा, तोही काही तासांसाठी होत आहे. त्यानिमित्ताने छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर भव्य शासकीय कार्यक्रम, शामियाना, उद्घाटनांचा धडाका आणि जिल्हाधिकार्यांचा सत्कार आयोजित केला जातो. पण या कार्यक्रमात उपस्थित कोण? कार्यकर्ते की अधिकारी-कर्मचारी?
आज सकाळपासून बीडमधील प्रमुख शासकीय कार्यालयांत एकही अधिकारी-कर्मचारी जागेवर नाही. कामकाज वार्यावर सोडलं गेलंय. मात्र मैदानात हजेरी लावणं अनिवार्य! हा कार्यक्रम जनतेसाठी आहे की केवळ वरिष्ठ अधिकार्यांची पाठ थोपटून घेण्यासाठी?
आणखी गंभीर बाब म्हणजे या कार्यक्रमाच्या अधिकृत पत्रिकेत कुठेही नवनिर्वाचित नगराध्यक्षांचं नाव नाही. म्हणजे काय? अजित पवारांच्या शासकीय कार्यक्रमाला बीडच्या लोकनिर्वाचित नगराध्यक्षांना काहीच स्थान नाही का? की मुद्दाम लोकप्रतिनिधींना बाजूला ठेवून प्रशासनच सर्वकाही असा संदेश देण्याचा हा प्रयत्न?
एक कडक, रांगडा आणि कामावर विश्वास ठेवणारा पालकमंत्री बीडला लाभणं हे जिल्ह्याचं भाग्य आहे. पण त्या भाग्याचा वापर जर प्रशासन स्वतःच्या स्तुतीसाठी करत असेल, उपमुख्यमंत्र्यांपुढे स्थानिक राजकीय नेतृत्वाबाबत अविश्वासाचं वातावरण निर्माण करत असेल, चुकीची माहिती सादर करत असेल-तर ते प्रशासनिक प्रामाणिकपणाचं लक्षण नाही, तर ते राजकीय परिस्थितीचा गैरफायदा आहे. हे उघडपे आम्हीतरी म्हणू. अजितदादांना कामासाठी वेळ पुत नाही. हे जेवढे त्रिवार सत्य आहे तेवढेच दादा, इथल्या अधिकारी-कर्मचार्यांना कामचुकारपणा करण्यासाठी वेळच वेळ असतो हेही तेवढेच खरे. लोकांनी लोकंसाठी लोकांकरिता चालवलेल्या लोकशाहीच्या रारज्यात प्रशासकीय अधिकारी कर्मचारी हे लोकांची कोंडी करत असतात आणि शासक म्हणून ती कोंडी फोडण्याचं काम नेतृत्वाचं असतं. परंतु इथं लोकप्रतिनिधी शासकांना नेरेटिव्हद्वारे जणू जेरबंद केलय. त्यामुळे दादांनी लोकशाहीच्या विचाराला अनन्यसाधारण महत्व देत इथे गणपती करताना मारुती होऊ नये याची दखल घेत अधिकाशाहीचे चोचले अधिक वाढवू नयेत. इथे जिल्हा पोलीस अधिक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कर्तव्य दिसते, परंतु जिल्हाधिकार्यांचे कर्तव्यापेक्षा फार्स अधिक प्रमाणात चर्चेत राहतो. जिथे फार्स असतो तिथे कर्तव्यशुन्यता असते. हे आम्ही सांगण्याची अजितदादांना तरी गरज नाही.
आज प्रश्न अनेक आहेत, पण उत्तर एकच आहे-
बीड सुधारतोय की फक्त दाखवला जातोय?
आणि जर सुधारणा फक्त दौर्यापुरती असेल, तर दोष राजकारणाचा नाही दोष त्या प्रशासनिक मानसिकतेचा आहे, जी लोकशाहीपेक्षा कौतुकाला जास्त महत्त्व देते.












