बीड : ऑनलाईन रिपोर्टर
जिल्ह्यातील विविध घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या समांतर तपासाला मोठे यश मिळाले आहे. चकलांबा व माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांचा उलगडा करत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले आहे. तसेच चोरीस गेलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
चकलांबा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार गेवराई रोडवरील सूरज बिअर बार अँड परमिट रूम येथे अज्ञात चोरट्यांनी हॉटेलची खिडकी तोडून आत प्रवेश केला होता. चोरट्यांनी विविध कंपनीच्या दारूच्या बाटल्या व गल्ल्यातील रोख रक्कम चोरून नेली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. आरोपी चकलांबा रोडमार्गे गेवराईकडे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महार टाकळी परिसरात सापळा रचून कार्तिक विरसिंग नागपुरे (रा. मुंढवा, पुणे), आदित्य मयूर जाधव (रा. मांजरी, पुणे) आणि हर्षवर्धन मोहन रेड्डी (रा. केशवनगर, पुणे) यांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान संबंधित आरोपींनी चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली. तसेच इतर साथीदारांसह हा गुन्हा केल्याची माहितीही त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना चकलांबा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्याचा तपासही स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती व स्थानिक तपासाच्या आधारे एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीदरम्यान चोरीस गेलेला सुमारे ८० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यामुळे संबंधित घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.
ही कारवाई बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन्ही गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा केला.
चकलांबा येथील कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, शेखर औटे, पोलीस हवालदार राहुल शिंदे, आनंद मस्के, बबन सलगर तसेच पोलीस अंमलदार अशफाक सय्यद, अश्विनकुमार सुरवसे आणि सिद्धेश्वर मांजरे यांनी सहभाग घेतला. तर माजलगाव ग्रामीण येथील कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्यासह जोगदंड, पठाण, गित्ते, घोडके आणि मराडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्यास मदत झाली असून जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे.






