गणेश सावंत
धर्म रक्षावया साठीं । करणें आटी आम्हांसि ॥१॥वाचा बोलों वेदनीती । करूं संतीं केलें तें ॥ध्रु.॥न बाणतां स्थिति अंगीं । कर्म त्यागी लंड तो ॥२॥तुका म्हणे अधम त्यासी । भक्ति दूषी हरीची ॥३॥
अर्थ
या जगात आम्ही धर्मरक्षण करण्यासाठी श्रम करतो आम्ही संतांप्रमाणे आचरण करून मुखाने वेदनीति बोलतो. परमार्थामध्ये ब्रम्हसस्थीतीला पोहचाण्यापूर्वीच कर्माचा त्याग केल्याचे जो ढोंग करतो, तो ढोंगी आहे .तुकाराम महाराज म्हणतात, जो हरिभक्तीला दुषणे देतो, तो अधम समजावा.म्हणूनच आम्ही आज हा विषय घेत आहोत आठवडा भारत देशातल्या काही घटनाक्रमावर दृष्टीक्षेप टाकल्या नंतर खरंच हिंदुवाद्यांच्या राज्यात हिंदू खतरें मे आहे हे प्रयागराजमध्ये घडलेले प्रकरण केवळ एका संताच्या स्नानापुरते मर्यादित नाही, तर ते सत्तेच्या उन्मादाचे, प्रशासकीय अहंकाराचे आणि तथाकथित
‘धर्मरक्षकां’
च्या ढोंगाचे जिवंत उदाहरण आहे.मौनी अमावस्येसारख्या पवित्र दिवशी ज्योतिष पीठ बद्रीनाथचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना स्नानापासून रोखले जाते, पालखीतून जाण्यास मज्जाव केला जातो, आणि कळस म्हणजे — “तुम्ही शंकराचार्य कसे आहात, ते सिद्ध करा” अशी नोटीस बजावली जाते!
हा प्रश्न कोण विचारतोय?माघ मेळा प्रशासन!म्हणजे आता धर्माची ओळख प्रशासन देणार? परंपरा सरकारी शिक्क्यावर चालणार?हजारो वर्षांची सनातन परंपरा, शंकराचार्यांची गुरु-शिष्य परंपरा, मठांची मान्यता — हे सगळे बाजूला फेकून फाईल, नोटीस आणि सरकारी ठसा धर्मावर लादला जातोय.आज शंकराचार्यांना विचारलं जातंय, “तुम्ही कोण?”उद्या पुजाऱ्यांना विचाराल, “देव कुठे आहे ते दाखवा?”स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा संतप्त सवाल रास्त आहे “मी शंकराचार्य आहे की नाही हे राष्ट्रपती ठरवणार का?”हा सवाल केवळ त्यांचा नाही, तर संपूर्ण हिंदू समाजाचा आहे.ज्या सरकारला दिवस-रात्र ‘हिंदुत्व’ आठवतं, तेच सरकार आज शंकराचार्यांवर लाठीचार्ज करते, अपमान करते, आणि नोटीस बजावते.हे हिंदुत्व नाही —हे

राजकीय सत्तेचे हिंदुत्वावर
केलेले अतिक्रमण आहे.
भारतीय जनता पक्षाचे तथाकथित हिंदुत्व आता उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्यालाही कळू लागले आहे—हे श्रद्धेचे नव्हे, तर सत्तेचे हिंदुत्व आहे; मंदिराचे नव्हे, तर मतपेटीचे हिंदुत्व आहे; संस्कृतीचे नव्हे, तर बुलडोझरचे हिंदुत्व आहे.१८व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी उभारलेला, हिंदू धर्मात मोक्षाचे द्वार मानला जाणारा काशीचा मणिकर्णिका घाट आज भाजप सरकारच्या बुलडोझरखाली चिरडला जातो आहे. विकास, सौंदर्यीकरण, पर्यटन—ही गोड शब्दांची फसवी पखरण करून हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा उद्ध्वस्त केला जात आहे.हा विकास नाही, हा सांस्कृतिक दहशतवाद आहे!एकीकडे योगी आदित्यनाथ यांचे सरकार शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर स्नान करू देत नाही, त्यांच्या भक्तांवर लाठीमार करते, साधूंना फरफटत नेते—आणि दुसरीकडे हेच सरकार हिंदुत्वाचे ढोल बडवत फिरते.

हा कोणता धर्म? कोणती परंपरा? आणि कोणते हिंदुत्व?
काशीत ज्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर फिरला, त्या मतदारसंघाचे खासदार खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पण घाट उद्ध्वस्त झाल्याचे एक शब्दाचे दुःखही त्यांच्या तोंडातून निघाले नाही. मात्र सोमनाथ मंदिरात उघड्या जीपमध्ये उभे राहून डमरू फिरवत, भस्म लावत कॅमेऱ्यासाठी हिंदुत्वाचे नाट्य सादर केले जाते.हे श्रद्धेचे प्रदर्शन नाही, हा निव्वळ राजकीय तमाशा आहे.मणिकर्णिका घाटावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची मूर्ती ढिगाऱ्याखाली जखमी अवस्थेत पडलेली दिसते—आणि तरीही तथाकथित हिंदुत्ववाद्यांची एकही भुवई हलत नाही. शिंदे-होळकरांनी ज्या मराठी शौर्याचा इतिहास उत्तर भारतात घडवला, त्या इतिहासालाच आज पायदळी तुडवले जात आहे.

मराठा
इतिहासावर हा थेट हल्ला नाही तर काय?
भाजपच्या सत्ताकाळात हजारो मंदिरे तोडली गेली. इतका मंदिरविध्वंस बाबर, औरंगजेब, चंगेजखान यांनीही केला नसेल. काशी, अयोध्या, मध्य प्रदेश—जिथे जिथे ‘विकास’ पोहोचतो, तिथे तिथे मंदिरे जमीनदोस्त होतात.मंदिरे वाचवण्याच्या घोषणा देणाऱ्यांच्या काळातच मंदिरे सर्वाधिक धोक्यात आहेत, हे भयाण वास्तव आहे.मणिकर्णिका घाट म्हणजे केवळ दगड-चुना नाही; तो हिंदू श्रद्धेचा कणा आहे. इथे अंत्यसंस्कार म्हणजे मोक्षाचा विश्वास आहे. पण मोदी सरकारने जिवंत हिंदूंवर अन्याय करतानाच, मृत हिंदूंनाही मोक्ष नाकारणारा बुलडोझर चालवला आहे.हा हिंदुत्वाचा विकास नाही, हा
हिंदुत्वाचा कत्तलखाना
आहे.३५ कोटींच्या निधीसाठी हजारो वर्षांचा इतिहास, परंपरा आणि श्रद्धा मातीत मिसळली जात असेल, तर असा विकास जनतेला मान्य नाही. अहिल्यादेवींनी २८ वर्षांच्या कारकिर्दीत ६५ मंदिरे, घाट, धर्मशाळा उभारल्या—आज त्याच वारशावर भाजप सरकार हातोडा मारत आहे.स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या काळातच हिंदुत्व गंगेत बुडाले आहे.आज प्रश्न इतकाच नाही की मणिकर्णिका घाट का तोडला? खरा प्रश्न हा आहे—हिंदुत्वाच्या नावाखाली संस्कृतीचा सत्यानाश कोण करत आहे?आणि शंकराचार्यांना अडवणं, साधूंवर लाठीमार करणं पाहिल्यावर एकच वाक्य डोक्यात येतं—“हिंदू खतरें मे है” अशा घोषणा देणाऱ्यांच्या राज्यात, हिंदूच सर्वाधिक खतरें मे आहे!









