बीड (रिपोर्टर) स्वत:च्या सुरक्षेसाठी रिव्हॉल्व्हरची मागणी करत बीड जिल्ह्याला बदनाम करणारा आणि स्वत: लाच घेणारा अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे याच्यावर अखेर राज्य सरकारने निलंबनाची कारवाई करत निलंबन कार्यकाळात औरंगाबाद मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले आहेत. या कार्यकाळात कुठलीही खासगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नसल्याचे आदेशात सांगत असे केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
याबाबत अधिक असे की, अंबाजोगाई येथे कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता संजय कोकणे हे सातत्याने वादग्रस्त ठरले. पद स्वीकारल्यापासून त्यांनी या ना त्या कारणावरून चर्चेत राहत बीड जिल्ह्याला बदनाम केले. गुत्तेदार मंडळीकडून जीवीतास धोका असल्याचे सांगत थेट जिल्हाधिकार्यांकडे पत्राद्वारे पिस्तूल परवान्याची मागणी केली होती. कोकणेंच्या या पत्राने राज्यभर जिल्ह्याची बदनामी झाली होती. दुसरीकडे गुत्तेदारांकडून धोका म्हणणार्या कोकणेंनी 22 जून रोजी मोठ्या रकमेची लाच घेतली होती. ही लाच घेताना त्यांना रंगेहात पकडल्यानंतर त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील कलम 7 अन्वये अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गु.र.नं. 274/22 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र अद्याप त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली नव्हती. अखेर कोकणे यांना निलंबीत करण्यात आले असून या कार्यकाळामध्ये कोकणे मुख्यालय, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबाद येथे राहण्याचे आदेश दिले असून कोकणेंना पुर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. त्याचबरोबर या कालावधीमध्ये कुठलीही खासगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नसल्याचेही अव्वर सचीव मेघशाम नवार यांनी आदेशात म्हटले आहे.