मुंबई (रिपोर्टर) शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांच्या अपघातप्रकरणी आज विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. अजित पवार म्हणाले, अपघाताबाबत मेटेंच्या ड्रायव्हरची वक्तव्ये वारंवार बदलत आहेत. त्यामुळे मेटेंचा अपघात झाला की तो घातपात होता? अशी शंका निर्माण झाली आहे. सरकारने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे का?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर अपघाताची चौकशी सीआयडीकडे सोपवण्यात आल्याचे सांगितले. सर्वसामान्यांच्या मनात 1 टक्काही संशय राहणार नाही. अशा पद्धतीने तपास करण्यात येईल व कुणी दोषी आढळल्यास त्याला सरकार सोडणार नाही. दोषीवर तातडीने कारवाई केली जाईल, अशी ग्वाही फडणवीसांनी दिली.
अजित पवार म्हणाले, विनायक मेटे यांच्यासोबत अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या मृत्यूप्रकरणी सभागृहात प्रश्न विचारण्याची वेळ येईल, असे कधी वाटले नव्हते. मेटेंच्या ड्रायव्हरकडूनही अपघाताबाबत वारंवार वेगवेगळे वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात अपघाताबाबत शंका निर्माण होत आहेत. नुकतेच माझे विनायक मेटे यांच्या पत्नीसोबत बोलणे झाले. त्यांनी अपघाताबाबत काही प्रश्न विचारले आहेत. अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचण्यास टाळाटाळ केली का? असे असेल तर याप्रकरणी काही गुन्हा दाखल झाले आहे का? अपघाताप्रकरणी जबाबदारी निश्चित करुन सरकार कारवाई करणार का?, असे प्रश्न विनायक मेटेंच्या पत्नीने विचारले असल्याचे पवार यांनी सांगितले.
कुणालाही सोडणार नाही
यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ड्रायव्हरचे स्टेटमेंट बदलत असल्यामुळे शंका निर्माण होत असल्याचे खरे आहे. त्यामुळेच या अपघाताबाबत 1 टक्काही संशय राहू नये यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणात जो दोषी आढळले त्याला सरकार सोडणार नाही. गुन्हेगारी स्वरुपाचा तपास सीबीआय करणार आहे. याशिवाय वरिष्ठ अधिकार्यांकडून प्रशासकीय तपासही करण्यात येणार आहे. कर्तव्यात कुणी कसूर केल्याचे आढळल्यास सरकार अशांना पाठीशी घालणार नाही.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे 8 लेन करण्याची मागणी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांची गर्दी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सध्या 6 लेन असलेला हा मार्ग 8 लेन करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. अजित पवार म्हणाले, राज्यात सर्वाधिक वर्दळ असलेला हा महामार्ग आहे. या महामार्गावर अवजड वाहनांची संख्याही सर्वाधिक आहे. मार्गावर अवजड वाहने बेदरकारपणे चालवली जातात. त्यामुळे इतर वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच मार्गावरुन प्रवास करावा लागतो. या मार्गावर अवजड वाहंनांसाठी एक लेन असली तर ओव्हरटेक करताना अवजड वाहने लेन सोडतात. त्यामुळे अवजड वाहनांसाठी स्वतंत्र दोन लेन हवीत, अशी मागणी अजित पवारांनी केली.
रात्रीचा प्रवास टाळावा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे 8 लेन करणे आवश्यक असल्याचे सरकारचेही मत आहे. यासाठी महामार्गाच्या बाजूला जागा आहे का, याची चाचपणी केली जाईल. त्यानंतर आवश्यक तो निर्णय घेतला जाईल. याशिवाय विनायक मेटेंसोबत जे झाले, ते इतर कुणासोबतही होऊ नये यासाठी शक्यतो रात्री 3 ते पहाटे 5 पर्यंतचा प्रवास टाळावा, असे आवाहनही फडणवीसांनी केले.