अंबाजोगाई (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात मागील चार आठवड्यांपेक्षा अधिक काळात, पिके ऐन जोमात आल्यानंतर पावसाने मोठी उघडीप दिल्याने सोयाबीन, कापूस यासह बहुतांश पिके धोक्यात आली आहेत. हजारो हेक्टर शेती अक्षरशः सुकून गेली असून, माना टाकलेली, शेंगा वाळलेली सोयाबीन बघून वाईट वाटत आहे. ही परिस्थिती बीड जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी असून, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मागील वर्षी दिले त्याप्रमाणे धोक्यात आलेल्या सर्व पिकांना विमा संरक्षित रकमेच्या किमान 25% अग्रीम विमा मंजूर करून वितरित करावा, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्य सरकार कडे केली आहे.
धनंजय मुंडे यांनी आज अंबाजोगाई तालुक्यातील मुरकूटवाडी येथील सुकून गेलेल्या सोयाबीन पिकांची पाहणी केली. दोनही डोळ्यांनी अंध असलेल्या सुनील मुरकुटे यांच्या शेतातील सोयाबीन पाहणी करताना, सुकलेली सोयाबीन, ऐन बहरात वाळून गेलेल्या शेंगा अशी विदारक परिस्थिती पाहून चिंता व्यक्त केली.
दोनही डोळ्यांनी अंध असलेल्या सुनील मुरकुटे यांच्या समोर संकटांचा डोंगर उभा असून, अशीच विदारक परिस्थिती जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांची झाली आहे. या शेतकर्यांना (पान 7 वर)
आधार देण्याची गरज असून राज्य शासनाने प्रशासनाला व संबंधित विमा कंपन्यांना आदेशित करून तातडीने धोक्यात आलेल्या सर्व पिकांचे पंचनामे करून मागील वर्षी प्रमाणे किमान 25% अग्रीम रक्कम मंजूर करून तातडीने वितरित करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकार कडे केली आहे. तसेच याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी माजी आ. संजयभाऊ दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. गोविंदराव फड, राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदारसंघ प्रमुख गोविंदराव देशमुख, शिवहार भताने गुरुजी, नागनाथ महाराज मुरकुटे, अय्युब भाई शेख, बबन मुंडे, सीताराम हाडबे, सायस मुरकुटे, चंद्रकांत गायकवाड, माऊली गायकवाड, राहुल गायकवाड, कैलास गायकवाड, बापू राऊत यांसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.