सीएसने दिले चौकशीचे आदेश
बीड (रिपोर्टर) जिल्हा रुग्णालयामध्ये सिझर झालेल्या एका प्रसूत महिलेचा खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिला दगावली असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
सीमा अजय मांजरे (वय 25, रा. पाटोदा) या महिलेस प्रसुतीसाठी 4 सप्टेंबरला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 5 सप्टेंबरला महिलेचे सिझर झाले. 8 सप्टेंबरला तिला सुट्टी देण्यात आली. 10 सप्टेंबरला तिची प्रकृती बिघडल्याने तिला सानप हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले. त्यानंतर दीप हॉस्पिटल व कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान तिचा कृष्णा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. सिझर झाल्यानंतर सात ते आठ दिवस सुट्टी देता येत नाही तरी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने या महिलेस सुट्टी दिल्याने तिला इन्फेक्शन झाले आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांच्या वतीने करण्यात आला. लवकर सुट्टी देणार्या जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांविरोधात कारवाई करण्याची मागणी मयत महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केल्यानंतर डॉ. साबळे यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.