बीड (रिपोर्टर) जिल्ह्यात पहिल्या टप्यात 704 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा आजपासून प्रत्यक्षात बार उडणार आहे. यावर पोलिसांची करडी नजर आहे. निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी पोलिस अधिक्षकांनी सर्व ठाणेदारांकडून पॉईंट टू पॉईंट माहिती घेतली आहे. या पूर्वी निवडणूक संदर्भात गुन्हे दाखल असणार्या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यात 704 गावांपैकी तब्बल 185 गावं अतिसंवेदनशील आहेत. या गावात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त राहणार आहे.
या पंचवार्षिकलाही थेट जनतेतून सरपंचाची निवड असल्याने जो तो कामाला लागला आहे. गावकी ताब्यात घेण्यासाठी मातब्बर नेते गावात तळ ठोकून आहेत. त्याप्रमाणेच पोलीसही निवडणूक संदर्भात पॉईंट टू पॉईंट माहिती घेऊन ही निवडणूक पारदर्शी आणि सुरळीत कशी पार पडेल यासाठी रणनीती आखत आहेत. पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सर्व ठाणेप्रमुखांना आपआपल्या हद्दीतील संवेदनशील गावाच्या याद्या मागवल्या आहे तर यापुर्वी निवडणूक संदर्भात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत अशा सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना ठाणेदारांना दिलेल्या आहेत.
185 गावात बुथ कॅपचरींगसारख्या घटना घडल्या
बीड जिल्ह्यात निवडणूक संदर्भात अनेक मोठमोठे गावे अतिसंवेदनशीलमध्ये येतात. आजपासून प्रत्यक्षात ग्रामपंचायत निवडणुकीचा बार उडणार आहे. त्यातील 185 गावात यापुर्वी बुथ कॅपचरींगसारख्या घटना घडल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी पोलीस त्या त्या गावात अतिरिक्त बंदोबस्त ठेवणार आहेत.